आधी दारू चोरली मग थांबून प्यायली! चोरी करताना चोरट्यांचे 'पेग वर पेग' सीसीटीव्हीमध्ये कैद
बुलढाणा जिल्ह्यातील धाड येथे एका बिअरबारमध्ये चोरट्यांनी एक लाख 39 हजारांची चोरी केली.ही चोरी करताना चोरट्यांनी पेग वर पेर रिचवल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
बुलढाणा : जिल्ह्यातील धाड येथील बुलढाणा औरंगाबाद महामार्गावर असलेल्या हॉटेल राजा पॅलेसमध्ये परवा (शुक्रवार 10 डिसेंबर) रात्री अज्ञात चोरट्यांनी एक लाख 39 हजारांची चोरी केली. मात्र, हा गुन्हा करताना या चोरट्यांनी यथेच्छ मद्यपानही केलंय. मद्यपान करताना चोरटे हॉटेलमध्ये लावलेल्या CCTV मध्ये कैद झाले आहेत. याप्रकरणी धाड पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून आता या मद्यपी चोरांचा शोध पोलीस घेत आहेत.
औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर धाडपासून 1 किमी अंतरावर राजेश आसाराम मालवे यांच्या मालकीचे हॉटेल राजा पॅलेस नावाचे बिअरबार आहे. 10 डिसेंबरच्या रात्री 7:30 वाजता हॉटेलवर काम करणाऱ्या मजुरांनी हॉटेल बंद करुन घराकडे निघून गेले. त्यानंतर मध्यरात्री 12:30 नंतर अज्ञात चोरट्यांनी हॉटेलच्या बाजूची सिमेंट खिडकी व लाकडी दरवाज्याचा कडी-कोंडा तोडून हॉटेलमध्ये प्रवेश केला. हॉटेलच्या शोकेसमध्ये ठेवलेल्या नामांकित कंपनीची विदेशी दारू बॅगमध्ये भरली. त्यानंतर आपला मोर्चा गोडाऊनकडे वळवून दोन्ही ठिकाणांवरून तब्बल 1 लाख 39 हजार रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला. 11 डिसेंबरच्या सकाळी 10 वाजता मजूर हॉटेल उघडण्यासाठी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
या प्रकरणी राजेश आसाराम मालवे यांच्या फिर्यादीवरून धाड पोलिसांनी अज्ञात चोरट्यां विरोधात भादंवीचे कलम 461, 380 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास धाड पोलीस करत आहेत.चोरटे 'सीसीटीव्ही'मध्ये कैद
हॉटेल मालक मालवे यांनी हॉटेल परिसर व हॉटेलमध्ये 'सीसीटीव्ही' कॅमेरे लावले आहेत. या कॅमेऱ्यात चोरट्यांनी हॉटेलमध्ये प्रवेश केल्यापासून ऐवज घेऊन पोबारा केल्यापर्यंतचा संपूर्ण घटनाक्रम कैद झालेला आहे. तसेच एका चोरट्याचा चेहराही कॅमेऱ्याने स्पष्ट टिपला आहे. त्यामुळे गुन्ह्याची लवकरच उकल होईल, असा आत्मविश्वास तपास अधिकारी यांनी व्यक्त केला आहे.
श्वानपथक व ठसेतज्ञ पाचारण दरम्यान, घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते व धाड ठाणेदार झांबरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच बुलढाणा येथून श्वानपथक व ठसेतज्ञ पाचारण करण्यात आले. मात्र, हॉटेल परिसर व मुख्य रस्त्याच्या पलीकडे श्वान जुलीला मार्ग काढता आला नाही. तर ठसेतज्ञ यांना चोरट्याचे ठसे मिळून आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या : आरोपीला किती तासात पकडावे ह्याचे मापदंड असेल तर आणून द्या; नागपूर पोलिसांचे अजब उत्तर
चुलत्याकडून विनयभंग, त्रासाला कंटाळून अल्पवयीन पुतणीची आत्महत्या, आईचा आरोप
Buldhana Beer Robbery | आधी दारू चोरली मग थांबून प्यायली! बुलढाण्यातील चोरीची घटना CCTVमध्ये कैद