(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही : शरद पवार
पीक विम्यासंदर्भात शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी आहे. पिक विम्यासंदर्भात शिथिलता करण्यासाठी केंद्राकडे मागणी करणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले आहे.
मुंबई : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही, मुख्यमंत्र्यांना भेटून कर्ज काढण्यासाठी आग्रह करणार असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. मराठवाड्यातील शेतकरी ओल्या दुष्काळाच्या झळा सोसतोय. या पार्श्वभूमीवर शरद पवार आजपासून दोन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत.
अतिवृष्टीच्या संकटाला महाराष्ट्र तोंड देत आहे. काही जिल्ह्यांमध्ये नुकसानीचे प्रमाण अधिक आहे. नुकसान भरून काढण्यासाठी कर्ज घेण्याला पर्याय नाही. पीक विम्यासंदर्भात शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी आहे. पिक विम्यासंदर्भात शिथिलता करण्यासाठी केंद्राकडे मागणी करणार. हा प्रश्न खूप मोठा आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन यावर मात करायला हवी. केंद्र व राज्य सरकार दोघांनी एकत्र येऊन मार्ग काढायला हवा, असे शरद पवार म्हणाले.
शरद पवार म्हणाले, पीक पाहणी पंचनामे पुर्ण झाल्याशिवाय मदत जाहीर करता येत नाहीत. ती प्रकिया पार पडल्या शिवाय मदत नाही. पाण्यात वाहून गेलेल्या सोयाबीनला नियमात तरतूद नाही, ती करण्याची मागणी आम्हाला करावी लागणार आहे. जनावर वाहून गेली, गाव पातळीवर रस्ते खराब झाले यात मोठी गुंतवणूक करावी लागणार आहे.
महाराष्ट्रावर ऐतिहासिक आर्थिक संकट आहे. अतिवृष्टीचा ऊसाला मोठा फटका बसला आहे. मोठया प्रमाणावर ऊस गाळपासाठी वापरता येणार नाही. सोयाबीनचही मोठं नुकसान झाल आहे. कारखाने लवकर सुरू झाले तर त्याच गाळप होईल त्यामुळे उसाचे कारखाने लवकर सुरू करण्याबाबत चर्चा करू, असे शरद पवार यांनी सांगितले.
थोडा जरी स्वाभिमान शिल्लक असेल तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे त्या पदावर रहायचे की नाही याचा निर्णय घेतील. असे वक्तव्य करत कोश्यारी यांनी आता राजीनामा द्यावा, असेच सुचित केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपालांनी लिहीलेल्या पत्रातील भाषेबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही नाराजी व्यक्त केली होती. त्याचा आधार घेत पवार यांनी कोश्यारी यांना लक्ष्य केले.