एक्स्प्लोर
हल्लाबोल सभेत अजित पवारांची चप्पल लंपास
सर्वसामान्य कार्यकर्त्यांसोबत अजित पवार हेसुद्धा चोरट्यांच्या तावडीतून सुटले नाहीत. सभेच्या व्यासपीठाखाली अजित पवार यांनी चप्पल काढली होती. ती चप्पलही चोरट्यांनी लांबवली.

परभणी : सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने सुरु केलेल्या हल्लाबोल सभांना जमत असलेली गर्दी आणि लोकांच्या प्रतिसादाचा पक्षाला कितपत फायदा होतो, हे सांगता येत नसले, तरी चोरटे मात्र या गर्दीचा फायदा उचलत आहेत. परभणीत चोरट्यांनी कार्यकर्त्यांची पाकिटं आणि मोबाईलवर हात साफ केले. यातून राष्ट्रवादीचे नेते अजित पवारही सुटले नाहीत. अजित पवारांची चप्पलही चोरट्यांनी पळवली. चोरट्यांनी एक लाख साठ हजारांच्या रकमेवर डल्ला मारला. पोलिस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांच्या या प्रतापाचा फटका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना बसल्याने, एकंदरीत चोरीचा प्रकार चर्चेचा विषय झाला. सरकारच्या धोरणाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभरात हल्लाबोल सभांना सुरुवात केल्यानंतर प्रत्येक मतदारसंघात सभांचे आयोजन करण्यात आले. मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात चारही विधानसभा मतदरसंघात या सभा घेण्यात आल्या. पण पाथरी आणि सेलू येथे पार पडलेल्या सभेनंतर अनेकांची पाकिटे आणि मोबाईल गायब झाल्याचे लक्षात आले. यात सुमारे नऊ लोकांची पाकिटं चोरट्यांनी लांबवले. ज्यामध्ये लाखोंची रक्कम चोरांनी पळवली. सर्वसामान्य कार्यकर्त्यांसोबत अजित पवार हेसुद्धा चोरट्यांच्या तावडीतून सुटले नाहीत. सभेच्या व्यासपीठाखाली अजित पवार यांनी चप्पल काढली होती. ती चप्पलही चोरट्यांनी लांबवली. यामुळे पोलिसांनी नेमका कसा बंदोबस्त केला, यावरच चर्चा होऊ लागल्या आहेत. या प्रकरणात पाथरी पोलिसात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संजय कोल्हे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी चार संशयित इसमांना ताब्यात घेतले आहे.
आणखी वाचा























