दापोलीची धूपप्रतीबंधक बंधाऱ्याची प्रतिक्षा संपेना! धूप प्रतिबंधक बंधारा नसल्याने समुद्राचे पाणी वस्तीत
रत्नागिरी मतदार संघातील 17 पैकी 16 बंधारे मंजूर होत असताना दापोली मात्र दुजाभाव का असा प्रश्न उपस्थित आहे.
रत्नागिरी : निसर्ग, तौक्ते वादळानंतर समुद्र किनारपट्टीलगतच्या धूपप्रतिबंधक बंधाराचे महत्व अधोरेखित होत असताना दापोलीत समुद्र किनाऱ्यांना मात्र अद्यापी धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची प्रतीक्षा आहे. एकीकडे रत्नागिरी मतदार संघातील 17 पैकी 16 प्रस्तावांना मंजुरी मिळाली असताना,दुसरीकडे दापोलीचे खाते उघडले नाही. 8 पैकी एकही प्रस्ताव मंजूर न झाल्याने दापोलीकरांच्या तोंडाला पाणी पुसल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. मागील वर्षी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचा फटका दापोली, मंडणगड किनारपट्टीला बसला. यामध्ये बागायतीचे, घरांचे नुकसान झाले.
अनेक ग्रामस्थांच्या समुद्रालगत असलेल्या बागायती या मुख्य आर्थिक स्त्रोत आहेत. त्यामुळे या भागात बागायतींच्या संरक्षणासाठी धूप प्रतिबंधक बंधारे आवश्यक असल्याने गेल्या अनेक वर्षापासून याबाबतची मागणी शासन दरबारी प्रलंबित आहे. रत्नागिरी मतदार संघातील 17 पैकी 16 बंधारे मंजूर होत असताना दापोली मात्र दुजाभाव का असा प्रश्न उपस्थित आहे. अनेक वर्षाच्या मागणी मागणी असून लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
दापोली पतन विवाह विभागाकडून
- पाडले (500मी)
- आडे कोळीवाडा (600मी)
- पाजपंढरी (500 मी)
- आडे (600 मी)
- कर्दे (300 मी)
- सालदुरे (220 मी)
- मुरुड (200 मी)
- लाडघर भंडारवाडा (200 मी)
असे प्रस्ताव पाठवण्यात आले होते. मात्र यातील एकही पास करण्यात आलेला नाही.
2015पासून मागणी असली तरी दुर्लक्ष..
समुद्राच्या उधाणामुळे बघायतींचे मोठे नुकसान होते. मात्र 2015 पासून मागणी असतानाही बंधारा बांधण्यात आलेला नाही. ग्रामपंचायतमध्ये ठराव मंजूर आहेत.मात्र पुढील कार्यवाही झालेली नाही. स्थानिक आमदार,खासदार,मंत्री यांच्याकडे का लक्ष देत नाहीत असं माजी सरपंच व नुकसानग्रस्त बागायतदार संजय बाळ मुरुड यांचे म्हणणे आहे.