Palghar : कम्युनिस्टांचं झुंजार नेतृत्व हरपलं, कॉ. रतन बुधर यांचे अल्पशा आजाराने निधन
Palghar : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आणि किसान सभेचे नेते कॉ. रतन बुधर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.
पालघर : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्र राज्य कमिटी सदस्य, पालघर - ठाणे जिल्हा सचिवमंडळ सदस्य, महाराष्ट्र राज्य किसान सभेचे उपाध्यक्ष आणि पालघर ठाणे जिल्हा किसान सभेचे अध्यक्ष कॉ. रतन बुधर यांचे आज 19 डिसेंबर 2021 रोजी दुपारी महिन्याभराच्या फुफ्फुसाच्या आजारानंतर नाशिकमधील रुग्णालयात दुःखद निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. त्यांचा अंत्यविधी 20 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता जव्हार तालुक्यातील त्यांच्या वावर या गावी करण्यात येणार आहे.
कॉ. रतन बुधर हे गेले सुमारे 50 वर्षे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अत्यंत लढाऊ व निष्ठावंत नेते होते. लहान वयात असताना ते कॉ. मंगळ्या भोगाडे या ज्येष्ठ पक्षनेत्यांच्या तालमीत तयार झाले आणि त्यांच्यासोबत पक्षाची व किसान सभेची बांधणी करण्यासाठी ते संपूर्ण जव्हार व मोखाडा,विक्रमगड, वाडा, तलासरी या डोंगराळ अतिदुर्गम तालुके पायी फिरले. 1986-87 साली झालेल्या आंदोलनात ओझरखेड येथे झालेल्या पोलीस गोळीबारात कॉ. जान्या बुधर आणि कॉ. तुका ओझरे हे दोन कॉम्रेड शहीद झाले. 1992-93 साली जव्हार तालुक्यातील वावर-वांगणी येथे कुपोषणामुळे झालेल्या बालमृत्युंच्या प्रकरणात पक्षाने कॉ. रतन बुधर यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या प्रचंड लढ्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांना जव्हारला भेट द्यावी लागली आणि आदिवासी भागात कुपोषण रोखण्यासाठी अनेक नवीन योजना जाहीर कराव्या लागल्या. वनाधिकार कायद्याची आणि मनरेगाची अंमलबजावणी यावर अनेक जोरदार लढयांचे त्यांनी समर्थ नेतृत्व केले. जव्हार तालुक्यात पक्ष, किसान सभा आणि सर्वच जनसंघटनांचे ते आधारस्तंभ होते.
कॉ. रतन बुधर पूर्वी अनेक वर्षे त्यांच्या वावर गावचे सरपंच होते. पुढे ठाणे व नंतर पालघर जिल्हा परिषदेवर त्यांची अनेकदा प्रचंड बहुमताने निवड झाली. ते काही वर्षे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचेही सदस्य होते. 2020 साली झालेल्या निवडणुकीत ते उमेदवार नसतानाही जव्हार तालुक्यातील जिल्हा परिषदेची एक आणि पंचायत समितीची एक जागा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने जिंकली. स्वतः जवळ जवळ निरक्षर असतानाही त्यांनी जव्हार तालुक्यातील पक्षाचा गड बांधला आणि आपल्या अथक परिश्रमांच्या जोरावर अनेक दशके तो राखला, हे विशेष आहे.
कॉ. रतन बुधर गेल्या अनेक दशकांपासून सर्वांचे अत्यंत निकटचे कॉम्रेड आणि मित्र होते. त्यांनी कधीही आपली जबाबदारी टाळली नाही. पालघर ठाणे जिल्ह्यात 2006 ते 2009 या कठीण काळात पक्षाला वाचवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी इतर शेकडो कॉम्रेडससोबत कॉ. रतन बुधर यांचा सिंहाचा वाटा होता हे कधीच विसरले जाणार नाही.
संबंधित बातम्या
Palghar Crime : पालघरमध्ये चिमुकल्याची हत्या करणारा नराधम पोलिसांच्या ताब्यात
डहाणू वाढवण बंदर प्रकल्पात केंद्र सरकारचे एक पाऊल मागे; घेतला 'हा' निर्णय
शिवसेना पदाधिकाऱ्याने रचला स्वतःवरच गोळीबाराचा कट; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha