Coronavirus Maharashtra : मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाचा शिवसेना महापौरांनाच विसर
Coronavirus Maharashtra : आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत राज्यात ४० हजार रुग्णांची नोंद झाली आहे. दररोज वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे राज्याच्या चिंतेत भर पडली आहे.
![Coronavirus Maharashtra : मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाचा शिवसेना महापौरांनाच विसर thane mayor naresh mhaske break coronavirus rules Coronavirus Maharashtra : मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाचा शिवसेना महापौरांनाच विसर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/07/9a71864bb31262dc0ff62ff418bb45a1_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Coronavirus Maharashtra : राज्यात दररोज वाढणारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नवीन विक्रम करत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत राज्यात ४० हजार रुग्णांची नोंद झाली आहे. दररोज वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे राज्याच्या चिंतेत भर पडली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेहमीच गर्दी करु नका, मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा असे आवाहन राज्यातील जनतेला करत असतात. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या आव्हानाचा विसर शिवसेना महापौरांनाच पडला आहे. ठाणे महानगरपालिकेचे महापौर नरेश म्हस्के यांच्या कार्यक्रमाला गर्दी झाली होती. यावरुन विरोधकांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
ठाणे महानगरपालिकेचे महापौर नरेश म्हस्के यांनी सकाळी प्रसिद्धीपत्रक काढून सर्व नागरिकांना सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे आणि मास्क वापरण्याचे आवाहन केले. मात्र एका लोकार्पण कार्यक्रमात त्यांना या गोष्टीचा विसर पडला. या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी बघायला मिळाली. तसेच अनेकांनी मास्क देखील लावले नव्हते. या कार्यक्रमाला शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांनी देखील उपस्थिती लावली होती. राज्य सरकार आणि स्वतः मुख्यमंत्री सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करू नका, गर्दी टाळा असे आवाहन करत असताना अशा कार्यक्रमाची मुळात गरजच काय ? असा प्रश्न निर्माण होतो.
कालच ठाण्यामध्ये आजवरचे सर्वाधिक 2180 रुग्ण आढळून आले आणि आज हाच आकडा अडीच हजारांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा खुद्द महापौरच आयोजित करत आहेत. त्यामुळे महापौर आणि महापालिका प्रशासनाला सामाजिक जाणीव आहे का ? असा प्रश्न निर्माण होतो. यावर भाजपचे आमदार आणि ठाणे जिल्हा अध्यक्ष निरंजन डावखरे यांनी देखील ट्विटरवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण, असे म्हणत त्यांनी महापौरांवर टीका केली आहे. महापौर नरेश मस्के यांनी यावर अद्याप कोणताही प्रतिक्रिया दिलेली नाही.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)