धनुष्यबाण न मिळाल्यास दोन्ही गटाच्या निशाण्या ठरल्या? काय असणार दोन्ही गटाची निशाणी?
Thackeray vs Shinde : एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना धनुष्यबाण निशाणी हवी आहे. पण धन्यष्यबाण चिन्ह गोठवण्यात आलं तर दोन्ही गटानं प्लॅन बी तयार ठेवलाय का?
Shiv Sena Party Symbol : शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाला मिळणार? एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची पक्ष चिन्ह आणि पक्षाची लढाई निवडणूक आयोगासमोर होणार आहे. शुक्रवारी निवडणूक आयोगापुढे याबाबत सुनावणी होणार आहे. पण त्यापूर्वी दोन्ही गटानं पक्ष चिन्हाची तयारी सुरु केली आहे.
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना धन्यष्यबाण निशाणी हवी आहे. पण धन्यष्यबाण चिन्ह गोठवण्यात आलं तर दोन्ही गटानं प्लॅन बी तयार ठेवलाय का? कारण बुधवारी झालेल्या दसरा मेळाव्यात दोन्ही गटाकडून पक्षचिन्हाचं संकेत देण्यात आले आहेत.
शिंदे गटाची निशाणी “तलवार” असू शकते तर ठाकरे गटाची निशाणी “गदा” हे चिन्ह असू शकते. बुधवारी झालेल्या या दसरा मेळाव्यात दोन्ही गटानं जवळपास चिन्हांसाठी प्लॅन बी तयार केलाय की काय असंत वाटत होतं. हिदुत्वांचे विचार पुढे घेऊन निघालेले दोन्ही गट एकमेकांवर प्रहार करण्यासाठी आता सज्ज झाले आहेत आणि युद्धात लागणा-या शस्त्रांचा वापर दोन्ही गट निवडणुक चिन्ह म्हणून वापरण्याची शक्यता आहे. बीकेसीमध्ये तलावारीचं पुजन करून दस-या मेळाव्याला सुरुवात केली तर दुसरीकडे विरोधकांवर शिवतीर्थावर देखील शस्त्रपुजन करण्यात आलं पण प्रतिस्पर्ध्यावर हल्लाबोल करताना गदेचा वारंवार उल्लेख करण्यात आला.
एकनाथ शिंदे यांचा बीकेसी येथे झालेल्या दसरा मेळाव्यात 51 फूट तलवार दिसली होती. तलवारीचं भलमोठं लॅान्चिंग करण्यात आलं. मंचाच्याखाली भलीमोठी 51 फूट लांब तलवारीची प्रतिकृती साकारण्यात आली होती. त्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांनी 12 फुट लांब चांदीची तलवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेट दिली. आता एवढ्या मोठ्या सोहळ्यात धनुष्यबाणाचं लॅाचिंग करता आलं असतं पण तसं न करता खास
तलवारीवर लक्ष केंद्रीत कसं होईल यावर भर देण्यात आला.
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटानं धनुष्यबाण चिन्हावर आपला दावा सांगितला आहे. पण जर हे चिन्ह गोठवलं तर इतर चिन्ह काय असतील याचा अभ्यास दोन्ही गटाकडून पुर्ण झालाच असेल. निवडणुक आयोग धनुष्यबाणाचं काय करेल हे आताच सांगता येत नाही. पण दोन्ही गट मात्र नव्या चिन्हाच्या तयारीत दिसत आहेत.
बुधवारी शिवतीर्थवर झालेल्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाधडली. उद्धव ठाकरे वारंवार विरोधकांवर हल्लाबोल करत होते. पण यावेळी त्याच्या अनेक वाक्यांमध्ये गदेचा उल्लेख होता.
चिन्ह दिलं कसं जातं ?
निवडणूक आयोगाकडे चिन्हांची एक यादी तयार असते. त्याच्याकडे विविध चिन्ह तयार असतात. ज्यावेळी धनुष्यबाण चिन्ह गोठवलं जाईल त्यावेळी दोन्ही गटाला कळवलं जाईल आणि नव्या चिन्हासाठी सुनावणी लावली जाईल. निवडणूक आयोगाकडे असलेली चिन्ह ही दोन्ही गटांसाठी आधी उपलब्ध असतील. जर निवडणूक आयोगाकडे असलेली चिन्ह जर दोन्ही गटाला नको असतील तर त्यांच्याकडून आयोगाकडे विनंती केली जाईल. त्यामध्ये शिंदे आणि ठाकरे गट आपल्याला हव्या असलेल्या चिन्हासाठी मागणी करतील त्यावर आयोग निर्णय घेईल.
याआधीही झालेत बंड -
भारतात अशा प्रकरचे बंड होण्याची हि काही पहिलीच वेळ नाही. याआधी देखील समाजवादी पार्टी, एआयएडीएमके, लोकजनशक्ती पार्टी यांच्यामध्येही अंतर्गत बंड झालं होतं. 2017 साली अखिलेश यादवांना विधीमंडळातल्या सदस्यांचा मोठा पाठिंबा होता, त्यामुळे सायकल चिन्ह त्यांना गेलं होतं, 2021 मध्ये देखील एलजेपीचे विभाजन झाल्यानंतर निवडणूक आयोगानं त्यांचे बंगला चिन्ह आणि नाव गोठवले होते. आयोगानं चिराग पासवान यांच्या गटाला लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) असं नाव दिले आणि हेलिकॉप्टरचे चिन्ह दिले होते.
आता सर्वांना उत्सुकता आहे ठाकरे आणि शिंदे गटाची निशाणी काय असणार? दसरा मेळाव्यात वारंवार उल्लेख करण्यात आलेल्या तलवार आणि गदा चिन्ह दोन्ही गट घेणार की हिदुत्वांला शोभेल असं आणखी काही धारदार शस्त्रंच असणार हे लवकरच समजेल.