लातूरच्या कोरोनोग्रस्तांच्या संपर्कात आलेले उस्मानाबादचे 10 नागरिक होम क्वॉरंटाईन
लातूरमधील कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आल्यामुळे उस्मानाबादमधील 10 नागरिकांना होम क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे.
लातूर : जिल्ह्यातील निलंगा येथे आढळून आलेल्या आठ कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात आलेल्या उस्मानाबाद येथील दहा जणांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान, आठही कोरोनाग्रस्त अन्य काहीजणांसह उस्मानाबादच्या ढाब्यावर एक दिवस मुक्कामास होते. या ढाब्याचे नगरपालिकेच्या वतीने निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. निलंगा येथे आलेल्या 12 मुस्लीम यात्रेकरुंपैकी आठजणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांना लातूरमधील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील मशिदीत थांबलेले आठजण कोरोनाग्रस्त असल्याचे शनिवारी निदर्शनास आले. सर्व रुग्ण अन्य काही लोकांसोबत लातूरला जात असताना बुधवारी रात्रभर औरंगाबाद बाह्यवळण रस्त्यावरील मेवाड काझी ढाब्यावर मुक्कामास असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या भोजनाची व अन्य आवश्यक सोय करण्यासाठी उस्मानाबाद शहरातील काहीजण थांबले होते. उपविभागिय पोलिस अधिकारी मोतीचंद राठोड यांनी सर्वांना ट्रेस केले. त्यांना उस्मानाबादच्या जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले. तेथे प्राथमिक तपासणी करण्यात आल्यानंतर कोरोनासदृष्य लक्षणे सध्या तरी आढळलेले नाहीत. लक्षणे दिसून येण्यासाठी किमान 14 दिवसांचा कालावधी लागतो. यामुळे सर्व दहाजणांना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राज गलांडे यांनी होम क्वॉरंटाईन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाने या सर्वांची माहिती संकलित केली असून त्यांच्यावर आगामी 14 दिवस नजर ठेवण्यात येणार आहे, असे डॉ. गलांडे यांनी सांगितले. दरम्यान, रुग्ण मुक्कामास असलेला ढाबा पूर्णपणे सॅनेटाईज करण्यात आला आहे, अशी माहिती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कस्तुरे यांनी दिली.
लातूरमध्ये आठ मुस्लीम यात्रेकरूंना कोरोनाची लागण; उत्तर भारतातून दक्षिणेकडे सुरू होता प्रवास
धार्मिक प्रचारासाठी मुस्लीम यात्रेकरुंचा प्रवास कोरोनाग्रस्त रुग्ण हरियानातून निघाले होते. धार्मिक प्रचार करत ते उस्मानाबादला पोहोचले. येथे पाहूनचार घेऊन तुळजापूर, नळदुर्ग, दाळींब, येणेगूर, सास्तुर येथे भेट घेत त्यांनी लातूर जिल्ह्यात प्रवेश केला असल्याचे समजते. उस्मानाबाद येथील तहसील कार्यालयातून त्यांची विचारपूस करण्यात आली होती. मात्र, त्यांच्याजवळ हरियानातील पास होता. तेथे खात्री करून तहसीलदारांनी त्यांना पुढे प्रवास करण्याची परवानगी दिली असल्याचे तहसीलदार गणेश माळी यांनी सांगितले.
Nashik Vegetable Basket | नाशिकमध्ये 5 ते ८ किलोच्या भाजीपाल्याचं बास्केट, सह्याद्री फार्म कंपनीचा उपक्रम