शिक्षक व पदवीधर विधानपरिषद निवडणूक पुढे ढकलली, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर, तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. ही निवडणूक आता पुढे ढकलण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.
मुंबई : शिक्षक आमदारकीची निवडणूक 10 जूनला जाहीर झाल्यामुळे लोकसभेची निवडणूक ड्यूटी आटोपून सुट्टीवर जाणाऱ्या शिक्षकांच्या आनंदावर विरजण पडलं होतं. मात्र आता निवडणूक आयोगाने (Election Commission) शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक (Teachers Graduate Legislative Council Elections) पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष किसन मोरे (Subhash More) यांनी आमदार कपिल पाटील यांच्यासोबत दिल्लीत जाऊन भारत निर्वाचन आयोगाकडे मागणी केली होती तर हायकोर्टात याचिकाही केली होती. भारत निर्वाचन आयोगाने याबाबतची प्रेस नोट जारी केली आहे.
'या' चार मतदारसंघासाठी जाहीर झाली होती निवडणूक
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर, तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. या चार जागांसाठी येत्या 10 जून रोजी मतदान होणार होते, तर 13 जूनला मतमोजणी केली जाणार होती. त्यामुळे हजारो शिक्षक मतदानापासून वंचित राहणार होते. त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला शिक्षकांचा मताधिकार सुरक्षित केल्याबद्दल सुभाष किसन मोरे यांचे आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे यांनी अभिनंदन केले.
अनिश्चित काळासाठी निवडणूक पुढे ढकलली
महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने 2 मे ते 14 जूनपर्यंत सुट्टीचा कालावधी जाहीर केला असून शाळा 15 जून नंतर सुरु होणार आहेत. तसेच 17 जून ते 20 जून पर्यंत बकरी ईद निमित्त उर्दू माध्यमांच्या शाळांना सुट्टी असते. मुंबईतील शिक्षक पदवीधर मतदार संघातील उत्तर भारतीय शिक्षक टिचर्स स्पेशल ट्रेनने 11 जून 2024 रोजी मुंबईत परतणार आहेत. तसेच महाराष्ट्रातील अनेक शिक्षक सुट्टी कालावधीत मूळ गावी किंवा कुटुंबासह पर्यटनासाठी बाहेरगावी गेले आहेत. उपरोक्त सर्व बाबींचा उल्लेख शिक्षक भारतीच्यावतीने निवडणूक आयोग आणि हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत केला होता. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने अनिश्चित काळासाठी ही निवडणूक पुढे ढकलली आहे
इतर महत्वाच्या बातम्या