...अन् विद्यार्थ्यांसाठी गुरूजी शिकले कोरकू भाषा!
आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणात गोडी लागण्यासाठी संपूर्ण अभ्यासक्रम कोरकू भाषेत भाषांतरीत केला. स्वतः कोरकू भाषा शिकत खिरोडकर गुरूजींनी उपेक्षित आदिवासींना शिक्षणाच्या प्रवाहात आणलं आहे.
अकोला : देशाच्या ग्रामीण भागातील सरकारी शिक्षणाची अवस्था आजही चिंताजनक आहे. साधनांसोबतच ईच्छाशक्तीच्या अभावानं ग्रामीण भाग आजही शिक्षणाच्या नवप्रवाहांपासून काहीसा मागे पडला आहे. मात्र, या अंधाऱ्या वाटेवरही प्रकाश पेरण्याचा प्रयत्न अनेक शिक्षक करीत आहेत. त्यांच्या उपक्रमशील शिक्षणांतून ते शिक्षणाचे नवप्रवाह या उपेक्षीतांच्या आयुष्यात प्रवाहीत करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतात.
अकोला जिल्ह्यातील तुळशीदास खिरोडकर 'गुरूजी' नावाचा असाच एक शिक्षक आहे. खिरोडकर 'गुरूजी' सध्या तेल्हारा तालुक्यातील खंडाळा येथे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. खिरोडकर गुरूजी उपेक्षित आदिवासींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या प्रेरणेनं भारलेला शिक्षक. दोन वर्षांपूर्वी त्यांची चंदनपुरच्या शाळेतून खंडाळा येथे बदली झाली. मात्र, चंदनपूरच्या शाळेत असतांना खिरोडकर गुरूजींमधील शिक्षकाला येथे असणाऱ्या परिस्थितीनं आव्हान दिलं. अन् या गावाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं हे आव्हान त्यांनीही स्विकारलं. त्यांच्या प्रयोगातून आज या गावासह तेल्हारा तालूक्यातील आदिवासी भागात शिक्षणाचा नव'जागर' सुरु झाला आहे.
काय होता चंदनपुर शाळेतील प्रयोग :
तेल्हारा तालूक्यातील चंदनपूर हे सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेलं शंभर टक्के आदिवासी गाव. गावात कोरकू आदिवासींचं प्रमाण सर्वाधिक. या आदिवासींची दैनंदिन वापरातील भाषा कोरकूच. गावात चौथ्या वर्गापर्यंत जिल्हा परिषदेची द्विशिक्षकी शाळा आहे. शाळेची पटसंख्या 35च्या आसपासची. मात्र, वर्गात विद्यार्थ्यांना शिकवत असतांना शिक्षकांना भाषेची सर्वात मोठी अडचण होती. गावातील बोलीभाषा आणि व्यवहाराची भाषा कोरकूच असल्याने लहान मूलांसाठी मराठी भाषा अनोळखीच. त्यामुळे पहिली-दुसरीतील विद्यार्थ्यांना मराठीतून शिकवणं म्हणजे शिक्षकांसाठी अग्नीदिव्यच. त्यामूळे हे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून काहीसे वेगळे पडल्यासारखेच झालेत.
परंतु, शिक्षक तुळशिदास खिरोडकर यांनी या आव्हानाला संधी मानत या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा चंग बांधला. त्यांनी कोरकू भाषा आत्मसात करणं सुरु केलं. यासाठी व्यवहारातील शब्द, वाक्य त्यांनी गावातीलच लोकांकडून शिकायला सुरुवात केली. सहा महिन्यात खिरोडकर यांनी कोरकू भाषा शिकून घेतली. आता खिरोडकर सर पहिली दुसरीतल्या विद्यार्थ्यांशी कोरकू भाषेत बोलू लागलेत. विद्यार्थ्यांनाही आता शिक्षणात मज्जा येऊ लागली. आता पहिली दुसरीतील विद्यार्थ्यांना मराठीतील मुळाक्षरं अन् मुळाक्षरांचे शब्द आता कोरकूतून शिकायला मिळू लागलेत. त्यासोबतच मराठीतून कोरकूत भाषांतरीत केलेल्या कविताही आता त्यांना आवडू लागल्यात. त्यातून वर्गातील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढली.
मराठी अभ्यासक्रमाचं 'कोरकू' भाषेत काढलं पुस्तक :
आता तुळशिदास खिरोडकरांनाही शिकवतांना मजा येत होती. एरव्ही तोंडी सांगितले जाणारे शब्द जर पुस्तक रूपांतून पुढे आणण्याची संकल्पना आता त्यांच्या डोक्यात घोळत होती. अन् त्यातूनच खिरोडकर गुरूजींनी पहिली-दुसरीच्या सामाईक अभ्यासक्रमाचा अंतर्भाव असणारं मराठी अभ्यासक्रमाच्या कोरकू भाषांतराचं पुस्तक छापून घेतलं. या पुस्तकाचं नाव होतं 'बालस्नेही'.आता पुस्तकातील अक्षरं, चित्रं अन मराठी शब्दांचे कोरकू भाषेतील अर्थ पाहून येथील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिक्षण 'सुलभ' झालं होतं.
विद्यार्थीही आता आनंदानं शिकायला लागले होते. आता कोरकू विद्यार्थ्यांसाठी 'अ' अजगराचा, 'आ' आखे (कोरकू भाषेत कुऱ्हाड), 'इ' इटोचा (कोरकू भाषेत विट), 'ई' ईफटिंजचा (कोरकू भाषेत चूल) असं शिक्षण मिळायला लागलं. मुलं आता दररोज शाळेत जायला लागल्यानं पालकही आनंदीत होते. पुढे समाजाच्या मदतीतून गुरूजींनी 13 टॅबलॉईडही विद्यार्थ्यांना मिळवून दिले होते.
'लोकजागर फाऊंडेशन'च्या माध्यमातून शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम सुरु :
चंदनपूर गावातील शाळेचा चेहरामोहरा बदलत असतांना तुळशिदास खिरोडकर यांची 2018 मध्ये दोन वर्षांतच तालुक्यातीलच खंडाळा येथे बदली झाली. आता चंदनपुरमधील शैक्षणिक उपक्रम थांबतील की काय?, असा प्रश्न गावकऱ्यांना पडला होता. मात्र, बदली झाल्यानंतरही खिरोडकर गुरूजींचं गावावरील प्रेम मात्र कमी झालं नाही. आता त्यांच्या सोबतीला होतं 'लोकजागर फाऊंडेशन'... 2016 गुरूजींसोबत जिल्हाभरातील विविध क्षेत्रातील लोक एकत्र येत 'लोकजागर फाऊंडेशन'ची स्थापना झाली. आता गुरूजींच्या कार्याला आणखी व्यापकता आली होती. आता चंदनपूरच्या शाळेत दरवर्षी फाऊंडेशनच्या माध्यमातून ही भाषांतरीत पुस्तकं वितरीत केली जाऊ लागलीत. फक्त चंदनपुरच नव्हे तर सातपुडा पर्वतरांगेतील अनेक आदिवासी शाळांमध्ये 'बालस्नेही'ची पुस्तकं वाटली गेलीत.
गुरूजींनी शैक्षणिक उपक्रमांसोबतच आता जिल्ह्यातील अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होणं सुरु केलं होतं. 'लोकजागर फाऊंडेशन'च्या माध्यमातून तेल्हारा तालुक्यातील करी रूपागड गाव दत्तक घेतलं गेलं. फाऊंडेशननं गावकऱ्यांमध्ये जनजागृती करीत पाणी फाऊंडेशनच्या 'वॉटर कप' स्पर्धेत सहभाग घेतला. गावामध्ये जलसंधारणाच्या कामाचा जागर करीत आभाळभर काम उभं केलं गेलं. यातूनच 'वॉटर कप' स्पर्धेत करी रूपागड तालूक्यातून पहिलं आलं. पुढे गजानन महाराज प्रगटदिनानिमित्त शेकडो पालख्या शेगावला जात होत्या. या पालख्या गेल्यानंतर पालखीमार्गाची स्वच्छता मोहीम हाती घेणारं 'माझी वारी, स्वच्छ वारी अभियाना'तही त्यांनी विद्यार्थ्यांसह प्रत्येकवर्षी सक्रीय सहभाग नोंदवलाय. सोबतच दिवाळीत आदिवासींना कपडे आणि फराळ वाटपाचा कार्यक्रमही 'लोकजागर फाऊंडेशन'च्या माध्यमातून होत असतो.
'शिक्षकदिनी' केलं नई तलाई गावात पुस्तक वाटप :
अकोला जिल्ह्यात पुनर्वसीत काही आदिवासी गावांमध्ये सध्या शाळेची व्यवस्था झालेली नाही. शिक्षणाची सोय नसलेल्या 'नई तलाई' या गावात 'जागर फाऊंडेशन'नं एक अनोखा प्रयोग केला आहे. त्यांनी येथील पहिली दुसरीत जाण्याच्या वयातील विद्यार्थ्यांना कोरकू भाषेत भाषांतरीत केलेली 'बालस्नेही' पुस्तके वितरीत केलीत. शिक्षकदिनी ही पुस्तकं षा विद्यार्थ्यांना देत त्यांनी अनोखा शिक्षकदिन साजरा केला आहे.
दुर्गम भागातील आदिवासी अद्यापही शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकलेला नाही. दुर्दैवानं अनेक ठिकाणी लालफितशाही, संवेदना आणि गोडी नसलेले शिक्षक यामूळे हा वर्ग दिवसेंदिवस अधिकाधिक अज्ञानाच्या गर्तेत लोटला जात आहे. परंतू, सामाजिक संवेदना असणारे तुळशिदास खिरोडकर गुरूजींसारखे शिक्षक जर असले तर ही परिस्थिती बदलू शकते. असे प्रयोग राबविले गेले तरच डोंगरपायथ्याशी राहणारा आदिवासी समाजही शिक्षणाच्या मुळ प्रवाहात येऊ शकतो, हे मात्रं निश्चित.