Teacher Day Special : हात पाय गमावले तरी विद्यार्थ्यांना शिकवण्याची जिद्द कायम, जिगरबाज शिक्षिकेची कहाणी
Teacher Day Special : शिक्षक दिनाच्या दिवशी आज आम्ही तुम्हाला अशा शिक्षिकेची कहाणी सांगणार आहोत. ज्या शिक्षिकेने आजारात आपले दोन हात दोन पाय गमावले. मात्र, असं असताना या बाईंनी हार मानली नाही.
Teacher Day Special : शिक्षक दिनाच्या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला अशा शिक्षिकेची कहाणी सांगणार आहोत. ज्या शिक्षिकेने आजारात आपले दोन हात दोन पाय गमावले. मात्र, असं असताना या बाईंनी हार मानली नाही. तर समोर आलेल्या संकटाशी दोन हात करत जिद्दीने या शिक्षिका पुन्हा एकदा तेवढ्याच जोमाने शिकवायला लागल्यात. एका शिक्षकाची इच्छाशक्ती काय काय साध्य करू शकते, याचं उदाहरण त्यांनी समाजासमोर ठेवलं आहे.
प्रतिभा हिलीम असं या आदर्श शिक्षिकेचं नाव आहे. पालघर जिल्ह्यातल्या अति दुर्गम भागात राहणाऱ्या जिल्हा परिषद शाळेत शिकवणाऱ्या शिक्षिका. मागील 27 वर्षापासून शिकवण्याचे व्रत अगदी मनापासून पार पाडत आहेत. मात्र, जून 2019 ला शाळेच्या पहिल्या दिवशी त्या आजारी पडल्या आणि त्यातच त्यांना गँगरीन झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. गँगरीनच्या उपचारादरम्यान विष शरीरात पसरवू नये म्हणून निकामी झालेले दोन्ही हात आणि दोन्ही पाय तातडीने शस्त्रक्रिया करून काढावे लागणार असं डॉक्टरांनी सांगितलं आणि हिलीम बाईंची पायाखालची जमीन सरकली.
हात पाय काढायचे म्हटल्यावर खरंतर त्याचवेळी आता आपल्यासाठी सगळं संपलं. आता आपण आयुष्यात कधीच लेखणी हातात घेऊन शिकवू शकणार नाही. हा विचारच त्यांना मेल्याहून मेल्यासारखा करत होता. पण आपल्या मुलांसाठी जगायचं त्यांनी ठरवलं आणि आपले हात गमावून जगायला सुरवात केली. पण हात पाय गमावल्यानंतर शांत बसतील त्या शिक्षिका कसल्या? त्यांनी हात पाय नसताना सुद्धा शिकवायचं ठरवलं. कारण अवयव निकामी झाले तरी आतला शिक्षक त्यांना आतून शांत बसू देत नव्हता. त्यामुळे आपल्या जिद्द आणि सकारात्मक ऊर्जेच्या बळावर शिकवण्यासाठी तयार झाल्या.
कोरोनाचा काळ होता. लॉकडाऊनमुळं शाळा बंद ऑनलाइन शिक्षण सुरू होतं.पण ज्या भागात या बाई राहत होत्या. त्या आदिवासी पाड्यात ऑनलाइन शिक्षण मिळत नसल्याने मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी आता या मुलांना शिकवायचं ठरवलं. मग त्यांनी आपल्या अंगणात या मुलांना मोफत शिकवायला सुरवात केली आणि रोज अंगणातच शाळा भरायला लागली. सुरवातीला पाच, दहा, वीस करत आता या दुर्गम भागातील 40 मुलांना हिलीम बाई शिक्षण देत आहेत.
हात पाय नसताना शिकवण्याची ताकद या शिक्षिकेला विद्यार्थ्यांकडूनच मिळते. पण मागील दोन वर्षापासून बिनपगारी रजेवर असलेल्या बाईंना पुन्हा आपण पूर्वी शिकवत असलेल्या जिल्हा परिषद शाळेत जायचंय. तिथे मुलांना शिकवायचं. पण फिटनेस सर्टिफिकेट मिळत नसल्याने मनाने- शरीराने पूर्ण फिट आलेल्या बाईंना शाळेत रुजू होता येत नाहीये आणि त्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे आणि प्रशासनाकडे त्या विनंती करत आहेत.
शिक्षक आपल्याला शिक्षणाबरोबर आयुष्य कसं जगायचं शिकवतो. त्यामुळेच प्रत्येकाच्या जडणघडणीमध्ये शिक्षकाचा मोठा वाटा असतो. प्रतिभा हिलीम ज्यांनी हात पाय गमावून सुद्धा त्यांना आतला शिक्षक स्वस्थ बसू देत नाहीये. शिक्षक कोण आहे? त्याचं कार्य त्याला कसा महान बनवतं? हे हलीम बाईंच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या इच्छाशक्तीवरून आणि कठीण परिस्थितीत सुद्धा शिकवण्याच्या जिद्दीवरुन कळतं. त्यांना फिटनेस सर्टिफिकेट मिळवण्यासाठी आणि पुन्हा शाळेत जाण्याची धडपड सुरू आहे. त्याला लवकरच यश मिळेल अपेक्षा करूया आणि या समाजाला शिक्षकदिनी 'शिक्षक' या शब्दाचा अर्थ समजून सांगण्याऱ्या या शिक्षिकेला 'शिक्षक दिनी' माझा सलाम करूया !!!