Ravikant Tupkar : रविकांत तुपकरांच्या पत्रात नेमकं काय? शिस्तपालन समितीनं राजू शेट्टींना मागितला खुलासा
15 ऑगस्टपर्यंत रविकांत तुपकर यांनी शिस्तपालन समितीसमोर त्यांचे म्हणणे मांडावे असे सांगितले होते. मात्र, तुपकर हे हजर झाले नाहीत. त्यांनी एका पत्राद्वारे त्यांचे आक्षेप आणि मुद्दे शिस्तपालन समितीला पाठवले आहेत.
Ravikant Tupkar : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Saghtana) नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) हे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. तुपकरांनी त्यांच्यावर काही आक्षेप देखील नोंदवले आहेत. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं शिस्तपालन समितीसमोर रविकांत तुपकर यांनी 15 ऑगस्टपर्यंत त्यांचे म्हणणे मांडावे असे सांगितले होते. मात्र, तुपकर हे हजर झाले नाहीत. त्यांनी 10 पानांच्या भल्या मोठ्या एका पत्राद्वारे त्यांचे आक्षेप आणि मुद्दे शिस्तपालन समितीला पाठवले आहेत. तसेच राजू शेट्टींनी (Raju Shetti) देखील तुपकरांनी पत्र पाठवलं आहे. या पत्रासंदर्बात शिस्तपालन समितीने राजू शेट्टी यांना खुलासा मागितला आहे.
19 जुलैपर्यंत राजू शेट्टींनी म्हणणं मांडावे
दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांच्याशी एबीपी माझानं संपर्क साधला. यावेळी त्यांनी सांगितलं की, रविकांत तुपकर यांचे पत्र आम्हाला मिळाले आहे. यामध्ये त्यांनी काही आक्षेप नोंदवले आहेत. राजू शेट्टींच्या संदर्भात देखील काही आक्षेप या पत्रात आहेत. यासंदर्भात आम्ही राजू शेट्टींना खुलासा मागितला आहे. यासाठी राजू शेट्टींना 19 जुलैपर्यंतचा वेळ दिला आहे. 19 जुलैपर्यंत राजू शेट्टी त्यांचे म्हणणे मांडतील. त्यानंतर आम्ही दोन्ही नेत्यांच्या भूमिकेचा विचार करु आणि त्यानंतर योग्य तो निर्णय घेऊ असे मत स्वाभिमानीच्या शिस्तपालन समितीचे सदस्य आणि प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी व्यक्त केलं.
तुपकरांचे आक्षेप
दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी पत्रात नेमकं काय लिहलं आहे, याची सध्या चर्चा सुरु आहे. कारण त्यांच्या या पत्रावर शिस्तपालन समितीनं राजू शेट्टींना खुलासा मागितला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रविकांत तुपकर यांनी संघटनेच्या नेतृत्वाबाबत काही आक्षेप नोंदवले आहे. संघटना वाढवण्यासाठी मोकळीक द्यावी यासंदर्भातील देखील काही मुद्दे रविकांत तुपकरांनी मांडल्याची माहिती मिळत आहेत. तसेच राजू शेट्टींच्या कार्यपद्धतीवर त्यांनी नाराजी व्यक्त करत आक्षेप नोंदवले आहेत. मात्रा, संपूर्ण पत्रात नेमकं तुपकरांनी काय म्हटलं हे त्यांनी स्वत: खुलासा केल्यानंतरच समजणार आहे.
मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न
दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेत कोणत्याही प्रकारचे दोन गट पडणार नाहीत. समजूतीने मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. राजू शेट्टींनी त्यांचे म्हणणे मांडल्यानंतर दोघांच्या मुद्यांचा विचार केला जाईल. त्यानंतर शिस्तपालन समिती योग्य तो निर्णय घेईल असे जगताप म्हणाले. रविकांत तुपकर यांनी शिस्तपालन समितीसमोर हजर राहून त्यांचे म्हणणे मांडावे असा आमचा आग्रह होता. मात्र, त्यांनी उपस्थिती दर्शवली नाही. त्यांनी पत्राद्वारे त्यांचे म्हणणं मांडल्याचे जगताप म्हणाले.
तुपकर राजू शेट्टींच्या कार्यपाध्दतीवर नाराज
रविकांत तुपकर हे गेल्या काही महिन्यांपासून राजू शेट्टी यांच्या कार्यपाध्दतीवर नाराज आहेत. त्यांनी गेल्या काही काळात राजू शेट्टी यांच्यावर उघडपणे टीका देखील केलीय. आपला केसाने गळा कापण्याचा प्रयत्न होत असल्याचे तुपकर म्हणालेत. त्यामुळं आता रविकांत तुपकर यांच्या मनात चाललंय तरी काय...? असा सवाल उपस्थित होतोय. दरम्यान, तुपकरांनी आपली भूमिका माध्यमांसमोर न मांडता त्यांनी शिस्तपालन समितीसमोर त्यांचं म्हणणं मांडावं अशी भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली होती. याबाबत पुण्यात 8 ऑगस्टला एका बैठकीचे आयोजनही करण्यात आले होते. मात्र, रविकांत तुपकर त्या बैठकीला हजर राहिले नव्हते. या बैठकीत तुपकरांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंतचा कालावधी देण्यात आला होता. दरम्यान, आपण संघटनेत राहूनच काम करणार असल्याची भूमिका रविकांत तुपकरांनी मांडली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: