नातू विजय आजोबा शरद पवारांना घेऊन ड्राईव्हला, आई सुप्रिया सुळेंचा आनंद गगनात मावेना
खासदार सुप्रिया सुळे यांचा मुलगा विजय सुळे आपल्या आजोबांना म्हणजे शरद पवार यांना ड्राईव्हसाठी घेऊन गेला. हा प्रसंग सुप्रिया सुळे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून शेअर केला आहे.
मुंबई : खासदार सुप्रिया सुळे यांचा मुलगा विजय सुळे आपल्या आजोबांना म्हणजे शरद पवार यांना ड्राईव्हसाठी घेऊन गेला. हा प्रसंग सुप्रिया सुळे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून शेअर केला आहे. यावेळी आई सुप्रिया सुळे यांचा आनंद गगनात मावेना झाल्याचं दिसून येतंय. या फेसबुक लाईव्हवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
लाईव्हमध्ये सुप्रिया सुळे म्हणतात की, आपली मुलं जेव्हा मोठी होतात. ती जेव्हा गाडी चालवायला शिकतात, त्यावेळी वेगळा आनंद पालकांना मिळतो. आज विजय सुळेंना त्यांचं ड्रायव्हिंग लायसन्स मिळालं आहे म्हणून तो आपल्या आजोबांना ड्राईव्हला घेऊन चालला आहे, असं सुप्रिया सुळे म्हणत आहेत. हॉर्न उगाच वाजवू नको, स्पीड लिमिट काय आहे माहित आहे ना? अशा सूचना देखील सुप्रिया सुळे या व्हिडीओत म्हणत आहे. खरंतर या छोट्या गोष्टी आहेत मात्र आई म्हणून या गोष्टी खूप मोठ्या आहेत, याचा खूप आनंद होतोय, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय.
या दरम्यान आजोबा शरद पवार देखील नातू विजयला हातवारे करुन काही सूचना करत असल्याचं दिसत आहे. याआधीही सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळेनं ही देखील आजोबा शरद पवारांना मुंबईतील पक्ष कार्यालयात घ्यायला आली होती, त्यावेळी खूप चर्चा झाली होती. पक्ष कार्यालयाबाहेर नात आपल्याला घ्यायला आली म्हटल्यावर पवार आजोबा तिच्याच कारमध्ये बसले होते. कारण नात रेवतीने तसाच आग्रह धरला होता.
शरद पवारांनी तरुणांना राजकारणात संधी देऊन राजकीय चमत्कार घडवले आहेत, त्यामुळे त्यांचा तरुणाई वरील विश्वास मोठा आहे. शरद पवार यांचे नातू पार्थ पवार व रोहित पवार सध्या राजकारणात आहेत. याच नातवांप्रमाणे शरद पवार त्यांच्या या नातवाला ड्रायव्हिंगचे धडे देत राजकीय स्टेअरिंगही हाती घेण्याचे सांगतील काय? हा ही एक मोठा प्रश्न या ड्रायव्हिंगच्या सफरीमुळे सर्वसामान्य जनतेला नक्कीच पडला असेल.