Supriya Sule : सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची पक्षांतरबंदी कायद्यानुसार खासदारकी रद्द करा, सुप्रिया सुळे यांची शरद पवारांकडे मागणी
Supriya Sule Letter To Sharad Pawar : पक्षाच्या दोन खासदारांनी पक्षाची विचारसरणी बाजूला सारून पक्षविरोधीस कारवाई केल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
मुंबई: अजित पवारांच्या शपथविधीसाठी उपस्थित राहिलेल्या राष्ट्रवादीच्या सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या दोन खासदारांना पक्षांतरबंदी कायद्याखाली अपात्र ठरवा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी यासंबंधी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांना एक पत्र लिहिलं असून त्यामध्ये ही मागणी केली आहे.
खासदार सुनिल तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाच्या अध्यक्षांना अंधारात ठेऊन त्यांना कोणतीही कल्पना न देता शपथविधीस कार्यक्रमाला उपस्थिती लावली आणि पक्षविरोधी कारवायात सहभाग नोंदवला असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. तसेच या दोन्ही खासदारांवर दहाव्या अनुसूचीनुसार, पक्षांतरबंदी कायद्याखाली अपात्रतेची कारवाई करावी अशीही मागणी त्यांनी केली.
Supriya Sule Letter To Sharad Pawar : काय लिहिलंय सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या पत्रात?
खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे या संसदेतील दोन खासदारांनी पक्षविरोधी कारवाई करत 2 जुलै रोजी झालेल्या शपथविधीला उपस्थिती दाखवली होती. त्यानंतर या दोन्ही खासदारांनी माध्यमांसमोर त्यांची भूमिका मांडत पक्षाच्या नियमांचे उल्लंघन केलं आहे. या दोन खासदारांनी आणि पक्षाच्या नऊ आमदारांनी पक्षाची कोणतीही संमती न घेता निर्णय घेतला आहे.
पक्षाच्या अध्यक्षांना अंधारात ठेवत, त्यांना कोणतीही कल्पना न देता या नेत्यांनी काही गोष्टी केल्या. त्यामुळे ते पक्षातून बडतर्फीस पात्र ठरतात. पक्षाच्या या दोन खासदारांनी राष्ट्रवादी पक्षाची विचारसरणी बाजूला सारल्याचं स्पष्ट झालं आहे.
स्वतःच्या राजकीय महत्त्वाकांक्षा साध्य करण्यासाठी या नेत्यांनी पक्षविरोधी कारवाई केली आहे. तसेच राष्ट्रवादीला देण्यात आलेल्या मतांना त्यांनी न जुमानता मतदारांचाही विश्वासघात केला आहे.
त्यामुळे राज्यघटनेच्या 10 व्या परिशिष्टानुसार, पक्षांतरबंदी कायद्यांच्या अंतर्गत या नेत्यांवर तात्काळ अपात्रतेची कारवाई करण्यात यावी अशी विनंती.
Mr.Sunil Tatkare and Mr. Praful Patel on 2nd July 2023 acted in direct contravention of the Party Constitution and Rules, amounting to desertion and disqualification from the party membership.
— Supriya Sule (@supriya_sule) July 3, 2023
I request Hon. @PawarSpeaks Saheb to take immediate action and file disqualification… pic.twitter.com/Uj2iG6C6kz
ही बातमी वाचा: