Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष घटनापीठासमोर; 'या' मुद्यांवर होणार निर्णय
Maharashtra Political Crisis: राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी आता घटनापीठासमोर होणार आहे. काही मुद्यांवर घटनापीठ निर्णय देणार आहे.
Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष (Maharashtra Political Crisis) आता घटनापीठाकडे गेला आहे. सरन्यायाधीश रमण्णा (CJI Ramanna) यांच्या नेतृत्वातील तीन सदस्यीय खंडपीठाने हा निकाल दिला आहे. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी पाच सदस्यीय घटनापीठासमोर होणार आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणी गुरुवारी होणार आहे. निवडणूक आयोगासमोर प्रलंबित असणाऱ्या मुद्यांबाबत सुप्रीम कोर्ट महत्त्वाचे निर्देश यावेळी देण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश रमण्णा हेच घटनापीठ स्थापन करण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश रमण्णा 26 ऑगस्ट रोजी निवृत्त होणार आहेत.
घटनापीठाकडे कोणत्या मुद्यावर सुनावणी?
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात सुप्रीम कोर्टात एकनाथ आणि शिवसेना यांच्याकडून याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. घटनापीठासमोर काही मुद्यांवर सुनावणी होणार आहे. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर ही सुनावणी होणार आहे.
>> कोणत्या मुद्यावर घटनापीठ निर्णय घेणार?
> विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव प्रलंबित असताना आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी करू शकतात का?
> या दरम्यान सभागृहाचे कामकाज कसे सुरू राहिल?
> राजकीय पक्षातील अंतर्गत लोकशाही आणि त्यात निवडणूक आयोगाची भूमिका या मुद्यांवर घटनापीठ सुनावणी करणार आहे.
घटनापीठ म्हणजे काय?
महाराष्ट्राच्या आमदारांच्या अपात्रतेबाबतची सुनावणी आता सुप्रीम कोर्टाचे घटनापीठ करणार आहे. सध्या महाराष्ट्राचे सत्तांतर हे कायद्यासाठी सुद्धा पेच निर्माण करणारे मानले जात आहे. जेव्हा कायद्याशी संबंधित एखादा मोठा प्रश्न सुनावणीला असतो, ज्यात संविधानातील कायद्याचा अर्थबोध ही करायचा असतो, अशा वेळी घटनापीठ स्थापन केले जाते. तसेच देशाच्या राष्ट्रपतींनी अनुच्छेद 143 (1) अंतर्गत केलेल्या एखाद्या संदर्भाची जर सुनावणी असेल तरीही घटनापीठ स्थापित केले जाते. सामान्यतः घटनापीठ स्थापित केले जात नाही, पण इतर ही काही परिस्थितींमध्ये घटनापीठ स्थापित केले जाऊ शकते. घटनापीठाचा निर्णय हा बदलणे सोपे नाही आणि येणाऱ्या बऱ्याच काळासाठी घटनापीठाने दिलेला निर्णय हा कायद्यासाठी मार्ग ठरतो.
शिवसेनेच्या मागणीनंतर आजच झाली सुनावणी
यापूर्वी 3 आणि 4 ऑगस्ट अशी सलग दोन दिवस सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. तेव्हापासूनच सातत्यानं हे प्रकरण पुढे ढकललं जात होतं. शिवसेनेसाठी हे प्रकरण अत्यंत महत्त्वाचं असल्यामुळे त्यांनी आज हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या वतीनं तातडीनं मेन्शन करण्यात आलं. त्यामुळे आज अखेर या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.
महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात होणारी सुनावणी गेल्या 24 तासांत दुसऱ्यांदा लांबणीवर गेली होती. सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीबाबत अनिश्चितता होती. सुप्रीम कोर्टाच्या सप्लिमेंट्री लिस्टमध्ये महाराष्ट्राच्या कामकाजाचा आजसाठी समाविष्ट नव्हतं. त्यामुळे सुनावणी आज होण्याची शक्यता कमीच दिसत होती. अशातच वारंवार तारीख पुढे जात असल्यानं सुप्रीम कोर्टात आज शिवसेनेच्या वकिलांनी हे प्रकरण मेन्शन केलं होतं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं हे प्रकरण पटलावर घ्यायला मान्यता दिली आहे. त्यामुळे आज या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
महाराष्ट्रात (Maharashtra) नवनिर्वाचित शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं असलं, तरी सत्तापेच मात्र कायम आहे. कारण महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पेच अद्याप सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत 'तारीख पे तारीख'चं सत्र सुरु झालं आणि जूनपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणाच्या सलग चार तारखा लांबणीवर गेल्या.