Shiv Sena : 'मुंबई'वरून हिवाळी अधिवेशन तापणार; आता होऊन जाऊ द्या, ठाकरे गटाच्या सुनिल प्रभूंचे आव्हान
Shiv Sena UBT On Mumbai : ठाकरे गटाने मुंबईच्या मुद्यावर चर्चा करण्याचे आव्हान स्वीकारले आहे. त्यामुळे नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात ऐन थंडीत कोणाला घाम फुटणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
मुंबई : गुरुवारपासून हिवाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Winter Session) सुरू होणार असले तरी त्याआधी सभागृहाबाहेर राजकीय वातावरण तापू लागले आहे. या अधिवेशनात मुंबईतील विकासकामे, प्रकल्प आणि महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे. शिवसेना-शिंदे गट (Shiv Sena Shinde Faction) आणि भाजप (BJP) विरुद्ध शिवसेना ठाकरे गटात (Shiv Sena UBT) आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडण्याची चिन्ह आहेत. तर, दुसरीकडे ठाकरे गटाने मुंबईच्या मुद्यावर चर्चा करण्याचे आव्हान स्वीकारले आहे. त्यामुळे नागपूरमधील (Nagpur) हिवाळी अधिवेशनात ऐन थंडीत कोणाला घाम फुटणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर हिवाळी अधिवेशन अनेकदा गाजल्याचेही आपण अनेकदा पाहिले आहे. विदर्भातल्या प्रश्नांवर गदारोळ होतो पण मुंबईतल्या काही घोटाळ्यांसंदर्भात आता सत्ताधारी ठाकरे गटाविरोधात आक्रमक होण्याच्या तयारीत आहेत. मुंबईत मंगळवारी शिवालय येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुंबईच्या निवडणुका आणि कंत्राटदारावरुन एकनाथ शिंदेना भाजपला डिवचले आहे. आता उद्धव ठाकरेंनी टीका केल्यानंतर सत्ताधारी बाकांवरून आक्रमक होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
सत्ताधारी कोणत्या मुद्यावर आक्रमक होणार?
सत्ताधाऱ्यांनी तर या अधिवेशनात उद्धव ठाकरेंच्या काळातील घोटाळ्याची यादीच बाहेर काढण्याची तयारी केली आहे. कोरोना काळातील घोटाळे , रस्ते घोटाळे , नाले सफाई घोटाळे किंवा खिचडी घोटाळ्यांवरून ठाकरे गटावर झालेले आरोप या सर्वांची चौकशी लावण्याच्या तयारीत सत्ताधारी दिसत आहे.
ठाकरे गटाने आव्हान स्वीकारले
शिवसेना ठाकरे गटानेदेखील सत्ताधाऱ्यांचे मुंबईवरील चर्चेचे आव्हान स्वीकारले आहे. या अधिवेशनात 'दूध का दूध, पानी का पानी' होऊ जाऊ द्या असं आव्हान ठाकरे गटाचे प्रतोद आणि मुंबईचे माजी महापौर सुनील प्रभू यांनी दिलं आहे. या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून आम्ही बोलूच, पण मुंबईच्या बाबतीत जे जे घडतंय त्यावर आम्ही सरकारला सोडणार नाही.मुंबई कोणाच्या घशात घालायला निघाले आहेत हे सर्वांना माहित असल्याचा हल्लाबोल सुनिल प्रभू यांनी केला आहे.
मुंबई महापालिकेच्या कारभाराबाबत ठाकरे गट आक्रमक
मुंबई महापालिकेवर सध्या प्रशासक असून त्या माध्यमातून राज्य सरकारचे महापालिकेवर नियंत्रण आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी देखील मुंबई महापालिकेत मुख्यमंत्र्याच्या जवळच्या कंत्राटदारांच्या फायद्यासाठी निर्णय घेतले जात असल्याचा आरोप केला. मुंबई महापालिकेच्या काही निर्णयांवर त्यांनी गंभीर आरोप केले होते. मुंबई महापालिकेवर मोर्चादेखील काढण्यात आला होता.
Sunil Prabhu : मुंबईबाबत जे घडतंय त्यावर आम्ही सरकारला सोडणार नाही!