(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सुजय विखे पाटील-रोहित पवार यांची छुपी युती, नगर जिल्हा बँकेच्या संचालकपदाची निवडणूक बिनविरोध
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुक होत असून वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी कुरघोड्या सुरु झाल्या आहेत. जामखेड विविध सेवा मतदारसंघातून विखे समर्थक असलेले जगन्नाथ राळेभात यांची संचालकपदी बिनविरोध निवड होणार आहे. रोहित पवार आणि सुजय विखे पाटील यांच्या छुप्या युतीमुळे भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे.
अहमदनगर : अहमदनगर जिल्हा बँकेची येत्या 20 फेब्रुवारी रोजी निवडणूक आहे. मात्र त्यापूर्वीच जिल्हा बॅंकेत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी राजकीय कुरघोड्यांना उधाण आले आहे. जामखेड विविध सेवा मतदारसंघातून जगन्नाथ राळेभात यांची बिनविरोध निवड होणार आहे. राष्ट्रवादी आमदार रोहित पवार आणि भाजप खासदार सुजय विखे यांच्या छुप्या युतीमुळे जगन्नाथ राळेभात यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु या छुप्या युतीचा फटका भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांना बसला आहे.
जगन्नाथ राळेभात आणि त्यांचा मुलगा अमोल राळेभात यांनी भाजपकडून अर्ज दाखल केला तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले यांनी अर्ज भरला. यामुळे निवडणुकीत उत्कंठा वाढली होती. मात्र ऐनवेळी पवार-विखे यांच्या छुप्या युतीमुळे राष्ट्रवादीच्या उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता जिल्हा बँकेच्या संचालकपदी जगन्नाथ राळेभात यांची बिनविरोध निवड होणार आहे.
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये यासाठी पक्षीय राजकारण बाजूला ठेऊन बिनविरोध निवडीचा निर्णय घेतला असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश भोसले यांनी सांगितले. आतापर्यंत 21 पैकी चार जागा बिनविरोध झाल्या असून यातील तीन जागा विखेंच्या ताब्यात गेल्या आहेत. ही निवडणूक नेहमीच विखे पाटील आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकामध्ये रंगते. यावेळी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले आहे. अशात अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत आमदार रोहित पवार यांनी विखे यांना सहकार्य केल्याची चर्चा आहे.
पवार-विखे कुटुंबातील वाद पवार आणि विखे पाटील कुटुंबातील वाद संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. शरद पवार आणि दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांच्यात अनेक वर्षांपासून संघर्ष चालला होता. हा वाद दुसऱ्या पिढीतही आला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी नगर दक्षिणची जागा काँग्रेससाठी सोडण्यास शरद पवारांनी नकार दिला होता. राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखेंना ही जागा हवी आहे. पण आघाडीत ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला येत होती. मात्र नगरमध्ये राष्ट्रवादीचं प्राबल्य असल्याचं सांगत शरद पवारांनी ही जागा सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. यामुळे काँग्रेस नेतृत्त्वाने कोणतंही लक्ष न घातल्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील नाराज झाले होते. परिणामी त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता.