Amravati News : पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांच्या कन्येचं 'नेत्रदीपक' यश; दृष्टिहीन माला एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण
पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांची दृष्टी नसलेल्या मानस कन्या माला पापळकरने कठीण परिश्रम, जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणले आहे. शंकरबाबा पापळकर यांच्या आश्रमातील माला एमपीएससी परीक्षा पास झालीय.
Amravati News अमरावती : आयुष्याच्या प्रवासात लाख संकट येत असता. मात्र, जे या संकटांवर मात करून ठामपणे उभे ठाकतात, विजयश्री अशाच्याच गळ्यात विजयाची माळ घालत असते. याचाच प्रत्यय आलाय तो अमरावतीमध्ये. (Amravati News) गेल्या अनेक वर्षांपासून शंकरबाबा पापळकर (Padmashri Shankar Baba Papalkar) हे अनाथ, दिव्यांग मुलांचा सांभाळ करत आले आहेत. त्यांच्या कार्याची महती ही सर्वदूर पसरली आहे. त्याच अनुषंगाने अलीकडेच त्यांना भारत सरकारने पद्मश्री हा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित देखील केलाय.
याचा आनंद अमरावतीकरांना असतांनाच दुसरीकडे आता दृष्टी नसलेल्या त्यांच्या मानस कन्या माला पापळकरने (Mala Papalkar) कठीण परिश्रम, जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणले आहे. शंकरबाबा पापळकर यांच्या आश्रमातील माला एमपीएससी (MPSC Exam) परीक्षा पास झालीय. महाराष्ट्र शासनाच्या सेवेत मालाची लिपिक आणि टंकलेखकपदी निवड झालीय. या कामगिरीमुळे शंकरबाबा पापळकरसह तमाम अमरावतीकरांचा उर अभिमानाने भरून आला आहे.
शंकर बाबा पापळकरांच्या आश्रमात आनंदोत्सव
अमरावतीच्या वझर येथील स्व.अंबादासपंत वैद्य स्मृती बालगृहाचे संचालक शंकरबाबा पापळकर यांची मानसकन्या माला हिने एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळवलाय. मालाने अभ्यासात सातत्य ठेवून पुढे आयएएस अधिकारी होण्याचा संकल्प व्यक्त केलाय. गेल्या अनेक वर्षांपासून शंकरबाबा पापळकर हे अनाथ, दिव्यांग मुलांचा सांभाळ करतात. अलीकडेच त्यांना भारत सरकारने पद्मश्री हा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित देखिल केलाय. याचा आनंद अमरावतीकरांना असतांनाच दुसरीकडे आता दृष्टी नसलेली त्यांची मानस कन्या मालाने कठीण परिश्रम, जिद्दीच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केलीय. वझरच्या बालगृहात राहुन तिने हे यश गाठलंय. या यशाबद्दल अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी मालाचे कौतुक केलेय. सोबतच शंकरबाबा पापळकर यांचा देखील सन्मान केलाय.
मालाचे नेत्रदीपक यश सर्वांसाठी प्रेरणादायी - जिल्हाधिकारी
नुकताच राज्य लोकसेवा आयोगाच्या मंत्रालयात लिपीक परीक्षेचा निकाल जाहीर झाला. एमपीएससी परीक्षेत कठोर परिश्रम घेत अनाथ व दिव्यांग माला पापळकर यांनी नेत्र दीपक यश मिळविले आहे. तिच्या या यशाबद्दल आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते मालाचा सत्कार करण्यात आला. तसेच डॉ.पापळकर यांना नुकतेच राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानिमित्त त्यांचेही शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी कटियार म्हणाले की, स्पर्धा परीक्षासंदर्भात बऱ्याच विद्यार्थांना भिती आणि शंका असतात. परंतु जन्मत:च दिव्यांग असलेल्या अनाथ मालाने जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर आज मोठ यश मिळविले आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे आपल्याला संधी मिळत नाही, साधनांचा अभाव आहे, असं गर्हाण गाणाऱ्या अनेक युवकांसाठी दिव्यांग माला पापळकरचा आदर्श खरोखरच प्रेरणादायी आहे, असे गौरवद्गार त्यांनी यावेळी व्यक्त केले.
रेल्वे स्थानक ते यशाला गवसणी, सारेचं प्रेरणादायी
माला ही जळगाव रेल्वे स्थानकावर बेवारस स्थितीत पोलिसांना सापडली होती. वझ्झर येथील दिवंगत अंबादास पंत वैद्य दिव्यांग बेवारस बालगृहात शंकरबाबा पापळकर यांनी तिच्या पुनर्वसनाची जबाबदारी स्वीकारून तिचे माला अस नाव ठेवून तिला स्वतःचे नाव दिले. मालाला लहानपणीपासूनच शिकायची, पुस्तक वाचायची आवड होती. जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर तिने येथील डॉ. नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय येथून दहावी आणि बारावी तसेच विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था येथून कला शाखेची पदवी प्राप्त केली. मालाच्या शिक्षणासाठी प्राध्यापक प्रकाश टोपले यांनी तर स्पर्धा परीक्षेसाठी युनिक अकॅडमीचे संचालक अमोल पाटील यांनी अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले.
इतर महत्वाच्या बातम्या