भाजप आमदाराकडून मुंबईतील उर्दू शिक्षण केंद्र रद्द करण्याची मागणी; ठाकरे सरकारने केली होती सुरुवात
सभागृहात बोलताना आमदार कोटेचा म्हणाले की, मागील विधानसभेच्या अधिवेशनात मला या विषयावर तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात सुरू करण्यात आलेली उर्दू शिक्षण केंद्र बंद करण्याची मागणी भाजप आमदाराने (MLA) केली आहे. मुलुंडचे भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी नागपूर विधानसभेच्या अधिवेशनात भायखळ्यातील उर्दू शिक्षण केंद्राचा (Urdu school) मुद्दा लक्षवेधीद्वारे उपस्थित केला. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) भूखंडाचे उर्दू शिक्षण केंद्रात रूपांतर करून कोटेचा यांनी महाविकास आघाडी (एमव्हीए) आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर तुष्टीकरणाचे राजकारण करण्याचा आरोप पुन्हा एकदा केला आहे. सध्या राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू असून या अधिवेशनाच्या कामकाजादरम्यान आमदार, सदस्य विविध प्रश्नांवर भाष्य करत सभागृहात आवाज उठवत आहेत. त्यातच, आमदार मिहीर कोटेचा यांनी उर्दू शिक्षण केंद्राचा मुद्दा उपस्थित करत सभागृहाचे लक्ष वेधले. तसेच, या उर्द केद्रांच्या स्थापनेमागे केवळ राजकीय लांगुलचालण हाच हेतू असल्याचा आरोप देखील त्यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.
सभागृहात बोलताना आमदार कोटेचा म्हणाले की, मागील विधानसभेच्या अधिवेशनात मला या विषयावर तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु, अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. या भागात बीएमसी संचालित सात शाळा आहेत, जिथे उर्दू शिकवली जाते. या शाळांमधील उपस्थिती केवळ 10 ते 20% आहे. उर्दू शिक्षण केंद्राऐवजी तेथे कौशल्य विकास संस्था उभारल्यास तरुणांना रोजगार मिळेल. म्हणून मी ही उर्दू लर्निंग सेंटर योजना रद्द करण्याची मागणी करतो. कारण, ती मविआ द्वारे अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणासाठी होती आणि तेथे आयटीआय बांधावी, अशी आग्रही मागणी कोटेचा यांनी केली आहे.
हेही वाचा
सोमनाथ सूर्यवंशीला श्वासोच्छवासाचा त्रास होता, हा जावईशोध कुठून लागला? जितेंद्र आव्हाडांचा थेट सवाल