जेएनयू विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचे देशभर पडसाद; मुंबई, पुण्यात विद्यार्थ्यांची निदर्शने
मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, मुंबई आयआयटी आणि पुण्यातील एफटीआयआयमधील विद्यार्थांनी जेएनयूमधील विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा निषेध केला.
मुंबई : दिल्लीतील जेएनयूमधील विद्यार्थी आणि प्राध्यापकांवरील हल्ल्याचे पडसाद देशभर उमटू लागले आहेत. मुंबईतही विविध ठिकाणी या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी विद्यार्थी एकत्र जमले होते. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, मुंबई आयआयटी आणि पुण्यातील एफटीआयआयमधील विद्यार्थांनी जेएनयूमधील विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा निषेध केला.
मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया भागात रात्री विद्यार्थ्यांनी निषेध नोंदवला. मुंबईतील विविध विद्यार्थी संघटना एकत्र आल्या आणि त्यांनी कँडल मार्च काढत घटनेचा निषेध केला. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आला होता. विद्यार्थी नेता उमर खालिद देखील या आंदोलनात सहभागी झाला होता. जेएनयूमधील फी दरवाढीचा विरोध डावलण्यासाठी या हल्ल्याचं षडयंत्र रचलं गेल्याचा आरोप उमर खालिदनं केला. तसेच जेएनयूमधला हल्ला हा सरकारनेच गुंड पाठवून घडवून आणल्याचा आरोपही उमर खालिदने केला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. कुलगुरुंनी विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकूण घेतलं पाहिजे. कुलगुरु केवळ सरकारचं ऐकत आहेत, त्यामुळे त्यांना बडतर्फ केलं पाहिजे, अशी मागणीही उमर खालिदने केली.
Mumbai: Students continue to protest outside Gateway of India against yesterday's violence in Jawaharlal Nehru University (JNU). #Maharashtra https://t.co/6uNb1f9iZR pic.twitter.com/6p2sikQLgl
— ANI (@ANI) January 6, 2020
आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांनीही एकत्र येऊन आंदोलन केलं. मध्यरात्री उशिरा आयआयटीतील सर्व विद्यार्थी एकवटले आणि त्यांनी जेएनयूतील विद्यार्थ्यांच्या हल्ल्याचा निषेध नोंदवला. तर तिकडे पुण्यातही एफटीआयआयमध्ये विद्यार्थ्यांनी रात्री उशीरा जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. या मार्चमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.
नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील हॉस्टेलमध्ये रविवारी अज्ञात हल्लेखोरांना राडा घातला. हल्लेखोरांनी लाठ्या-काठ्यांसह मुलीच्या हॉस्टेलवर हल्ला चढवला. हल्लेखोरांनी यावेळी जेएनयूएसयूची अध्यक्ष आयशी घोष हिला देखील मारहाण झाल्याचे समोर आले आहे. सर्व हल्लेखोरांनी तोंडाला रुमाल किंवा मास्क लावले होते. या हल्ल्यात जखमी झालेल्या 18 जणांना उपचारासाठी एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपासून दोन गटात तणाव आहे. दरम्यान, या प्रकरणाची गृहमंत्री अमित शाह यांनी दखल घेतली असून दिल्ली पोलीस आयुक्तांकडून प्रकरणाची माहिती घेतली. सोबतच या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.