एसटीच्या संपामुळं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा संघर्ष, आदिवासी पाड्यावरील मुलांचा दररोज 10 किमी प्रवास
एसटीचा सुरु असलेल्या संपामुळे विद्यार्थ्यांना पायपीट करुन परीक्षा केंद्रावर पोहोचावं लागतंय. रोज 8 ते 10 किलोमीटरची पायपीट करत विद्यार्थी शाळा गाठत आहेत.
मुंबई : राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरु झाल्या आहेत. शिक्षण घेण्यासाठी दुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांना आजही मोठा संघर्ष करावा लागत आहे. गावात, खेड्यापाड्यात एसटीचा मोठा आधार आहे. पण एसटीचा सुरु असलेल्या संपामुळे विद्यार्थ्यांना पायपीट करुन परीक्षा केंद्रावर पोहोचावं लागतंय. रोज 8 ते 10 किलोमीटरची पायपीट करत विद्यार्थी शाळा गाठत आहेत. एबीपी माझानं डहाणूतल्या विद्यार्थ्यांच्या व्यथा दाखवल्या आणि या व्यथा फक्त डहाणूतल्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे या व्यथा ऐकून एसटी कर्मचाऱ्यांना पाझर फुटणार का? सरकार यावर काही करणार, की डोळे झाकून गप्प बसणार? असे प्रश्न उपस्थित होत आहे.
स्कुल चले हम' म्हणत हसत, खेळेत शाळेला जाणारे विद्यार्थी आपण जाहिरातीत पाहिलेत. मात्र, या मुंबईपासून सव्वाशे किमी असलेल्या डहाणू तालुक्यातील या पाड्यातील विद्यार्थ्यांमध्ये शाळेत जाऊन परीक्षा देण्याचा उत्साह जरी मनातून असला तरी त्यांना बोर्डाच्या परीक्षेआधी आणि नंतर रोजच एका मोठ्या पायपीटीच्या परीक्षेला सामोरे जावं लागत आहे. पाड्यातून परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी या मुलांना पेपरच्या दोन तास अगोदर सकाळी 8 वाजता निघावे लागते. शाळेत पायपीट करत जायचं परत पायपीट करत घरी जातात. यामध्ये मुले थकून जातात.
एसटी सुरू असताना विद्यार्थ्यांकडे पास होता. मोफत एसटीचा प्रवास होता. मात्र, एसटी बंद असताना आता खासगी वाहनाने जायला सुद्धा पैसा घरातून दिले जात नाही कारण तशी घरच्यांची परिस्थिती पण नाही. मग मिळाले तर घरून नाहीतर मित्रांकडून उसणे घेऊन काही विद्यार्थी रिक्षाने जातात.
विलीनीकरणाच्या मुद्यावर एसटी आंदोलक आझाद मैदानावर बसले आहेत. एसटी संदर्भात सरकार बैठका घेत आहे पण यामध्ये कोणताही तोडगा निघत नाही. मात्र याचा फटका सर्वसामान्यांना होत आहे. एसटी बंदमुळे शाळेत रोज दूर जायचं कसे ? कशाला रोज पायपीट करायची ? म्हणत अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण सुद्धा सोडून दिले आहे. जर एसटी आणखी अशीच काही दिवस बंद राहिली तर शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढेल आणि याला जबाबदार कोण ? असा प्रश्न विचारला जात आहे.
एबीपी माझाचे महाराष्ट्राला आवाहन
या सगळ्या परिस्थितीनंतर एबीपी माझाने महाराष्ट्राला आवाहन केले आहे की, सध्या महाराष्ट्रात दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरु आहेत. नेमक्या याच काळात राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संपही सुरु आहे. त्यामुळे राज्यातील गावखेड्यांसह पाड्यांवर राहणाऱ्या हजारो विद्यार्थांना परीक्षेसाठी अनेक किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.त्यामुळे तुमच्या आजूबाजूला कुणाला परीक्षेसाठी पायपीट करावी लागत असेल, तर तुम्ही स्वेच्छेने त्या विद्यार्थ्यांचं पालकत्व घ्या. परीक्षेसाठी जाणाऱ्या मुलांना सेंटरपर्यंत पोहोचवण्यसाठी मदत करा!