एक्स्प्लोर
Advertisement
वड पाच्ची! लॉकडाऊनमध्ये दारुड्यांचा धुमाकूळ, अनेक ठिकाणी दारूची दुकानं फोडली
कोरोनामुळं केलेल्या लॉकडाऊनमध्ये दारुचं व्यसन असणाऱ्यांना आपली तलफ कशी भागवायची हा प्रश्न आहे.राज्यात काही ठिकाणी मद्यपींकडून दारुची दुकानं फोडल्याचे प्रकार समोर आले आहेत.
मुंबई : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने राज्यात लॉकडाऊन घोषित केला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहतील असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे तळीरामांची मात्र मोठी गैरसोय होताना दिसतेय. मात्र संचारबंदीचा फायदा उचलत काही तळीरामांनी चक्क दारूच्या दुकानावरच डल्ला मारला आहे. दारुड्यांनी आपली तलफ भागवण्यासाठी अनेक ठिकाणी दारुची दुकानचं फोडली आहेत. यातील काही घटना सीसीटीव्हीत देखील कैद झाल्या आहेत.
अमरावतीत गोदाम फोडले
अमरावती शहराच्या वलगाव मार्गावरील देशी दारूचे गोदाम चोरट्यांनी फोडले. गोदामाच्या पाठीमागून भिंतीला मोठे भगदाड करून चोरट्यांनी दारूच्या 250 पेट्या लांबवल्या. तब्बल साडे पाच लाखांची देशी दारू चोरट्यांनी लंपास केली. ही घटना काल सायंकाळी उघडकीस आली.
नागपुरात रोकड ठेवली फक्त दारु पळवली
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन आहे. त्यामुळे मद्यविक्रीची दुकाने, परमिट रूम आणि बिअरबार बंद ठेवण्यात आले आहे. हे लॉकडाऊन मद्यपींना मात्र त्रासदायक ठरत आहे. नागपुरात रोज मद्यपान करण्याची सवय असलेल्या दोन मद्यपींनी 'सदर' परिसरात सुविधा बारला निशाणा बनवले. बारच्या मागील बाजूची भिंत तोडून आत प्रवेश करत लाखो रुपयांची दारू लंपास केली. 31 मार्चच्या पहाटेचे दोघांचे हे कृत्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. त्यात दोघे जण बारमध्ये शिरल्यानंतर फक्त ब्रँडेड दारूच्या बॉक्सेसवर डल्ला मारत असताना दिसत आहेत. विशेष म्हणजे दोघांनी बारच्या आत इतर किमती ऐवज किंवा रोकडकडे लक्ष देखील दिले नाही. त्यामुळे त्यांची ही चोरी आर्थिक लाभासाठी नाही तर लॉकडाउनच्या काळात फक्त स्वतःची मद्यपानाची तलफ भागवण्यासाठी करण्यात आली असल्याचा संशय निर्माण झाला आहे. सदर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका तासात या दोन्ही चोरट्यांना अटक केली.
यवतमाळातही दुकान फोडले
यवतमाळ जिल्हयातील झरी येथे सध्या कोरोनामुळे बिअरबार आणि वाईन शॉप बंदचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व बार आणि शॉप बंद आहेत. यायाच फायदा घेऊन चोरट्याने रात्री झरी येथील एक बिअर बार फोडला. यातील एकून 33 हजारांच्या वेगवेगळ्या ब्रँडच्या दारू चोरट्यांने लंपास केल्या आहेत. वणी येथील रहिवाशी असलेले राहुल डफ यांचे झरी येथे राहुल नावाचा बार आहे. काल या परिसरात वादळी वारा होता. त्यामुळे तिथे चौकीदार नव्हता. याचाच फायदा येऊन अज्ञात चोरट्याने बारला लावलेले शटरचे लॉक तोडत बारमधल्या जवळपास सर्वच माल त्यांनी उचलून नेला.
सोलापुरात महागड्या दारुला हातही लावला नाही
सोलापुरातील विजापूर रोड येथील असलेल्या गुलमोहर दारूचे वाईन शॉप फोडत दारूची चोरी केल्याचा प्रकार समोर आलाय. यामध्ये चोरट्यांनी जवळपास 57 हजार रुपयांची दारू चोरून नेली आहे. विशेष म्हणजे या दुकानात महागड्या दारूच्या बाटल्या देखील होत्या. मात्र या तळीरामांनी महागड्या दारूला हाथ देखील लावला नाही. ते रोज पित असलेल्या विशिष्ट ब्रँडच्याच दारूच्या बाटल्या चोरीला गेल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास येत आहे. हा संपूर्ण प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांनी घटनेचा तपास करायला सुरुवात केली आहे. घटनास्थळावरून सीसीटीव्ही फुटेज घेतले असून चोरट्याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान सोलापुरातील विजापूर नाका पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगलीतही तळीरामांचा कहर
सांगलीत देखील कोरोनामुळे संचारबंदी असल्याने तळीरामांची मोठी गोची झाली आहे. दारूसाठी व्याकुळ झालेल्या तळीरामांना सांगली आणि मिरजेत थेट बंद असलेली 2 दारूची दुकाने फोडून दारूच्या बाटल्या लंपास केल्याचा प्रकार घडला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागांकडून सांगली जिल्ह्यात सर्व दारू दुकानांना सील ठोकून बंद केलं आहे. कुठेच दारू उपलब्ध होत नाही. त्यामुळे मद्यपींची मोठी गोची झाली आहे. यातूनच सांगली आणि मिरजेत तळीरामांनी थेट देशी दारूची दोन दुकाने फोडली आहेत. या देशी दारू दुकानामधून दारूच्या बाटल्या चोरल्या आहेत. याबाबत दारू दुकानदारांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला याची माहिती दिली.त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून या दोन्ही दुकानांना पुन्हा मोठी कुलप लावून सील करण्यात आले आहे.
तळीरामांना दारु पुरवण्यासाठी सोशल मीडियाचा आधार
तळीरामांना दारु पुरवण्यासाठी विरारमध्ये चक्क सोशल मीडियाचा आधार घेण्यात आला. इंस्टाग्राम सोशल नेटवर्कवर "द लिकर मॅन" या अकाऊंट द्वारे हा ग्रुप चढ्या दराने दारू विक्री करत होता. बियर विस्की, स्कॉच अशा दारुची फोटो टाकून त्याचे रेटही लिहून ठेवले होते. कुणाला पाहिजे असेल तर फोन नंबर दिला होता. याची माहिती विरार पोलिसांना मिळताच त्यांनी सापळा रचून दारु विकत घेण्याच्या बहाण्याने या टोळीचा भांडाफोड केला. यात संतोष मोहंती व आकाश सावंत यांना अटक करण्यात आली आहे. तर चिका नामक व्यक्ती यात फरार आहे.
दारू दुकानं चालू करायचं उद्धव ठाकरेंना सांगा, वृद्धाची आमदारांकडे मागणी
परभणीतील जिंतूर येथील बाजारामध्ये गर्दी झाल्यामुळे स्वतः जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर या रस्त्यावर उतरून लोकांना घरी बसण्याचे आवाहन करत होत्या. त्यावेळी एका वृद्धाने चक्क मेघना बोर्डीकर यांना दारूचे दुकान चालू करा, उद्धव ठाकरेंना सांगा आम्ही काय करायचे अशी मागणी केल्याने सर्वजण अवाक् झाले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
व्यसनी लोकं घेताहेत समुपदेशन
लॉकडाऊनच्या या कालावधीत दारु आणि सिगारेट मिळत नसल्याने या गोष्टीचं व्यसन असलेले अस्वस्थ झालेत. त्यामुळं अशा लोकांकडून समुपदेशनासाठी फोन करण्याचं प्रमाण लॉकडाऊनच्या कालावधीत वाढल्याच पुण्यातील मुक्तांगन व्यसनमुक्ती केंद्राच्या प्रमुख डॉक्टर मुक्ता पुणतांबेकर यांनी म्हटलं आहे. कुठल्याही व्यसनाच्या शारिरीक गुलामगिरीतून बाहेर येण्यासाठी चार दिवसांचा कालावधी पुरेसा ठरतो. लॉकडाऊनच्या या कालावधीचा उपयोग शारिरीक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारच्या गुलामगिरीतून सुटण्यासाठी करुन घेता येऊ शकतो असं डॉक्टर मुक्ता पुणतांबेकर यांनी म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement