ST Workers Protest Live Updates : एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन पुन्हा तापलं, वाचा प्रत्येक अपडेट
ST Workers Protest Live Updates : प्रलंबित मागण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचं शस्त्र उपसलं आहे. काल बैठकीत तोडगा निघाला असं सांगितलं होतं मात्र अनेक ठिकाणी आजही कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे.
LIVE
Background
अहमदनगर : अहमदनगरमधील शेवगाव येथील परिवहन महामंडळाच्या चालकाने आगारात उभ्या असलेल्या एसटीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी समोर आली आहे. या घटनेनंतर तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे. शेवगाव आगारातील दिलीप हरिभाऊ काकडे असे आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते चालक म्हणून येथील आगारात कार्यरत होते. डेपोत उभ्या असलेल्या एसटीच्या मागील बाजूस गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळा उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच आगराच्या अन्य कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी डेपोत धाव घेतली. पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही घटना समजताच मोठी खळबळ उडाली असून कर्मचाऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत.
लालपरी अखेर धावली! एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे, शासनाकडून मागण्या मान्य
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची धग पुन्हा वाढणार
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची धग पुन्हा वाढणार असल्याची शक्यता आहे. कोल्हापूरमध्ये शेवगावमधील कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याने पुन्हा आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. कोल्हापुरातील अनेक कर्मचारी आंदोलनात सहभागी. केवळ पन्नास टक्के वाहतूक सध्या सुरु असल्याची माहिती आहे. धुळे जिल्ह्यातील पाचही आगारातील संप अजूनही सुरू असून 1 हजार 91 बस फेऱ्या बंद आहेत. यामुळे महामंडळाला 30 लाख 50 हजार रुपयांचा फटका बसला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या सरकारकडून मान्य
आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या अखेरीस सरकारनं मानल्या आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं आहे. एस टी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 12 वरून 28 टक्क्यांवर वाढवण्यात आलाय तसंच घरभाडे भत्त्यातही वाढ केलेली आहे. आज मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचारी संघटनांची मंत्रालयात बैठक झाली त्यात काही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. तर उर्वरीत मागण्यांबाबत दिवाळीनंतर निर्णय घेणार असल्याचं मंत्री अनिल परब यांनी सांगितलं.
एसटी कामगारांना 28 टक्के महागाई भत्ता आणि वाढीव घरभाडे भत्ता देण्याचे सरकारने मान्य केलं आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासोबतच कामगार संघटनांची बैठक झाली. या बैठकीत मागण्यांवर तोडगा निघाला. त्यानंतर एसटी कामगारांचे आंदोलन मागे घेण्यात आले. सरकारच्या निर्णयानंतर 28 कोटी महागाई भत्ता आणि 2 कोटी घरभाडे असा 30 कोटी रूपयांचा भार दर महिन्याला एसटी महामंडळावर पडणार आहे. कृती समितिनं दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, मंत्री अनिल परब यांच्यासोबत झालेल्या बैठकीत वार्षिक वेतनवाढीचा दर दोन टक्क्यांवरुन तीन टक्के करण्यावरही सकारात्मक चर्चा झाली. तसेच आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असं आश्वासनही देण्यात आलं आहे.
काय आहेत एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या
- महागाई भत्ता देण्यात यावा
- वार्षिक वेतनवाढ ही दोनवरून टक्क्यांवरून तीन टक्के करण्यात यावी
- घरभाडे भत्ता 8, 16, 24 % प्रमाणे देण्यात यावे
- दिवाळीपूर्वी वेतन मिळावे
चंद्रपूर बसडेपोमध्ये पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू
चंद्रपूर बसडेपोमध्ये पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू झाले आहे. परिवहन कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर सरकारने तोडगा काढल्यानंतर काल रात्री हा संप मागे घेण्यात आला होता. मात्र, विलीनीकरणाच्या मागणीसाठी अनेक कर्मचारी आग्रही असल्याने विलीनीकरण झाल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याची भूमिका घेत जवळपास 400 कर्मचाऱ्यांनी काम बंद केले. या बंद मुळे सर्व बसेस बंद झाल्याने सामान्य लोकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय.
लालपरीने उभ्या महाराष्ट्राला साथ दिली, तिच्याच चालकांवरती आपला आयुष्याचा प्रवास संपवण्याची वेळ : गोपीचंद पडळकर
आर्यन खानच्या बचावासाठी ठाकरे सरकार जीवाचं रान करतंय, पण 28 मराठी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यावरसुद्धा यांच्या माणुसकीला जरासाही पाझर फुटत नाही, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडीवर केली आहे. आर्यन खानच्या बचावासाठी संपूर्ण ठाकरे सरकार जीवाचं रान करतंय. पण एकीकडे 28 मराठी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यावरसुद्धा यांच्या माणुसकीला जराही पाझर फुटत नाही.ज्या लालपरीने उभ्या महाराष्ट्राला त्याच्या सुख-दुखाच्या प्रवासात निरंतर अहोरात्र साथ दिली. आज तिच्याच चालकांवरती आपला आयुष्याचा प्रवास संपवण्याची वेळ येत असेल तर हे खूप लाजिरवाणा आहे, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडीवर केलीय. एस टी कर्मचाऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नका. आपण संघर्ष करू अशी विनंती पडळकर यांनी कर्मचाऱ्यांना केलीय. हे गेंड्याच्या कातडीचं सरकार त्यांचे अश्रु पुसण्याऐवजी संघटनेत फुट पाडून अफवा पसरवतय आणि पोलिसांच्या बळाचा गैरवापर करून संप चिरडण्याचा प्रयत्न करतंय. जे ‘राज्य कर्मचाऱ्यांना तेच एसटी कर्मचाऱ्यांना’लवकरात लवकर द्यावं. कुठल्याही पोलीस बळाचा वापर करू नये. अन्यथा आणखी एखाद्याने जीव गमावला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी मुख्यमंत्र्यांची असेल असेही, पडळकर म्हणालेत.
चंद्रपूर बस डेपोमध्ये पुन्हा कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
चंद्रपूर : चंद्रपूर बसडेपो मध्ये पुन्हा कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन... काल संध्याकाळी 8.30 वाजता कर्मचाऱ्यांनी वापस घेतला होता बंद मात्र विलीनीकरणाच्या मागणीसाठी अनेक कर्मचारी आग्रही, विलीनीकरण झाल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याची कर्मचाऱ्यांची भूमिका, संपामुळे प्रवाश्यांचे हाल, शेनगाव येथील कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येनंतर एसटी कर्मचारी पुन्हा आक्रमक
एसटी कर्मचाऱ्यानं केलेली आत्महत्या दुर्दैवी, कोणत्याही कर्मचाऱ्यांनं टोकाचं पाऊल उचलू नये, एसटी रूळावर आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू - अनिल परब
एसटी कर्मचाऱ्यानं केलेली आत्महत्या दुर्दैवी आहे. याबाबत मी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांसोबत बोललो आहे. कोणत्याही कर्मचाऱ्यांनं टोकाचं पाऊल उचलू नये. एसटी रूळावर आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. अशी प्रतिक्रिया परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. रत्नागिरी येथे ते बोलत होते. शिवाय, सध्याचा काही ठिकाणी सुरू असलेल्या संपाबाबत देखील मी कर्मचाऱ्यांशी, त्यांच्या संघटनांशी बोलत आहे. तसेच एसटीच्या विलिनिकरणाचा निर्णय राज्य सरकार घेईल असं देखील यावेळी परब यांनी म्हटलं आहे.
दिवाळीत कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारचं 'दिवाळं' निघाल्याशिवाय राहणार नाही, भाजप नेत्या चित्रा वाघ आक्रमक
भाजप नेत्या चित्रा वाघ आक्रमक, जवळपास 258 एस टी कर्मचा-यांच्या आत्महत्या, ऐन दिवाळीत त्यांच्या घरात अंधार पसरलाय.. पण मंत्री महोदय आहेत कुठे? मंत्र्यांनी बदल्यांच्या दलालीतून वेळ काढावा.. कर्मचा-यांकडे लक्ष द्यावे.. अन्यथा दिवाळीत कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष करणा-या सरकारचं ‘दिवाळं’ निघाल्याशिवाय राहणार नाही, भावांनो आत्महत्या करू नका रे ..परिवाराचा, आपल्या कच्च्याबच्च्यांचा विचार करा.. या मुर्दाड सरकारला वठणीवर आणायला आम्ही भारतीय जनता पार्टी पुर्ण ताकतीने आपल्या पाठीशी आहोत, असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय.
जवळपास २८ एस टी कर्मचा-यांच्या आत्महत्या..
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 29, 2021
ऐन दिवाळीत त्यांच्या घरात अंधार पसरलाय..
पण मंत्री महोदय आहेत कुठे?
मा.मंत्र्यांनी बदल्यांच्या दलालीतून वेळ काढावा..
कर्मचा-यांकडे लक्ष द्यावे..
अन्यथा दिवाळीत कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष करणा-या सरकारचं ‘दिवाळं’ निघाल्याशिवाय राहणार नाही