गणपती उत्सवाला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी उद्यापासून एसटी धावणार
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रवासात सामाजिक अंतर राखून एका बसमध्ये केवळ 22 प्रवासी घेऊन एसटी बसेस उद्या बुधवार 5 ऑगस्टपासुन 12 ऑगस्टपर्यंत सोडण्यात येत आहे.
धुळे : गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या मुंबईच्या चाकरमान्यांसाठी उद्या 5 ऑगस्टपासून एसटी बसेस नेहमीच्या बसस्थानकातून सोडण्यात येणार आहेत. त्यांचे प्रचलित तिकीट दरात, आगाऊ आरक्षण आज मंगळवार 4 ऑगस्ट मध्य रात्रीपासून सुरू होत असल्याची माहिती परिवहन मंत्री एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी दिली आहे.
अनिल परब म्हणाले की, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रवासात सामाजिक अंतर राखून एका बसमध्ये केवळ 22 प्रवासी घेऊन एसटी बसेस उद्या बुधवार 5 ऑगस्टपासुन 12 ऑगस्टपर्यंत सोडण्यात येत आहे. मंगळवार 4 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून या बसेसचे आगाऊ आरक्षण (एसटी महामंडळाच्या www.msrtc.gov.in या संकेतस्थळावर तसेच महामंडळाने अधिकृतपणे नेमलेल्या खाजगी प्रतिनिधीद्वारे) नेहमीच्या तिकीट दरात प्रवाशांना करता येईल. तसेच, सदर बसेस ह्या विनाथांबा असल्याने (नैसर्गिक विधी वगळून)शेवटच्या थांब्या व्यतिरिक्त कुठेही थांबणार नाहीत.
या बरोबरच ग्रुप बुकिंग(गट आरक्षण) करणाऱ्या प्रतिनिधींनी जवळच्या आगारात आरक्षणासाठी संपर्क साधावा. त्यांना देखील केवळ 22 प्रवाशांचे नेहमीचे एकेरी तिकीट दर आकारुन त्यांच्या कोकणातील गावापर्यंत थेट बस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं एसटी प्रशासनानं नमूद केलं आहे.
एसटी बसेस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ई-पासची गरज नाही. मात्र, प्रत्येक प्रवाशाला मास्क बंधनकारक करण्यात आलं आहे. संबंधित प्रवाशांना परतीच्या प्रवासाचे (23 ऑगस्ट पासून येण्यासाठी) आगाऊ आरक्षण देखील करण्याची सुविधा एसटी महामंडळाने उपलब्ध करून दिल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.