ST Strike: मोठी बातमी ! एसटी कामगारांच्या पगारात घसघशीत वाढ; मुख्यमंत्र्यांसमवेतच्या बैठकीनंतर संप मागे
ST Strike: एसटी संपाच्या (ST strike) पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्यासोबत संघटनांची बैठक झाली
ST Strike: मुंबई : राज्यातील एसटी कामगारांनी दोन दिवसांपासून पुकारलेल्या संपानंतर आज सह्याद्रीय अतिथी गृहावर एसटी कामगार संघटना आणि मुख्यमंत्री यांच्यात बैठक झाली. या बैठकीत चर्चे अंती राज्य सरकारने कामगारांच्या मागण्या मान्य करत एसटी कामगारांच्या पगारात घसघशीत वाढ दिली आहे. कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात साडे सहा हजाराची वाढ जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे, एसटी कर्मचारी संघटनांनी समाधान व्यक्त केलं असून लवकरच मुख्यमंत्र्यांकडून याची घोषणा केली जाईल. या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेतला जाणार आहे.
एसटी संपाच्या (ST strike) पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्यासोबत संघटनांची बैठक झाली. एसटी कर्मचारी कृती समिती संघटनेने बेमुदत संपाची हाक दिली होती, आज संपाचा दुसरा दिवस असून राज्यात प्रवाशांची मोठी गैरसोय झाल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा महाराष्ट्र दौरा असतानाच हा संप पुकारण्यात आल्याने प्रशासनाची मोठी धांदल उडाली होती. राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळातील कामगारांना वेतन द्यावे, या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलनाची हाक दिली .ऐन गणेशोत्सवात एसटी कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक देण्यात आल्याने चाकरमान्यांचेही हाल होत आहेत. आता या संपाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 7 वाजता संघटनांच्या प्रतिनिधींची तातडीची बैठक घेतली. त्यामध्ये एसटीच्या संपावर बैठकीमध्ये तोडगा काढण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दि.1 एप्रिल, 2020 पासून सरसकट मुळ वेतनात 6500 रुपये वाढ करण्याचा ऐतिहासिक निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.
अशी आहे पगारवाढ - गोपीचंद पडळकर
भाजप नेते गोपीचंद पडळकर म्हणाले, सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात सरसकट 6500 रुपयांची पगार वाढ केलेली आहे. ज्यांच्या पगारामध्ये 2021 पाच हजार रुपयांची वाढ झाली होती. त्यांच्या मूळ पगारामध्ये दीड हजार रुपयांची वाढ झालेली आहे. ज्यांना चार हजारांची वाढ दिली होती, त्यांच्या पगारामध्ये अडीच हजारांची वाढ झाली आहे. ज्यांना 2021 मध्ये अडीच हजारांची वाढ झाली होती, त्यांच्या पगारात 4 हजारांची वाढ झाली आहे. मी महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांच्या वतीने सरकारचे आभार व्यक्त करतो. सर्व संघटनांनी मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत केलं. महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांना विनंती आहे की, तुम्ही जो उस्फुर्तपणे संप पुकारला. त्या संपाला सरकारने यश दिलेले आहे. त्यामुळे आपण सर्वांनी उद्यापासून कामावर रुजू व्हावं, अशी तुम्हाला विनंती आहे.