दहावी आणि बारावी ऑक्टोबर-नोव्हेंबर 2020 पुरवणी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर
दरवर्षी दहावी-बारावीच्या निकालानंतर जुलै-ऑगस्टमध्ये पुरवणी परीक्षा घेतली जाते. यंदा कोरोना संसर्गामुळे पुरवणी परीक्षेबाबत काहीच स्पष्टता नव्हती. त्यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार की काय असा प्रश्न उपस्थित केला जात होता.
मुंबई : बोर्डाकडून दहावी आणि बारावी ऑक्टोबर-नोव्हेंबर 2020 पुरवणी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. दहावी बोर्डाची पुरवणी परीक्षा 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरदरम्यान होणार आहे, तर बारावी बोर्डाची पुरवणी परीक्षा 20 नोव्हेंबर ते 10 डिसेंबरदरम्यान होणार आहे.
दरवर्षी दहावी-बारावीच्या निकालानंतर जुलै-ऑगस्टमध्ये पुरवणी परीक्षा घेतली जाते. यंदा कोरोना संसर्गामुळे पुरवणी परीक्षेबाबत काहीच स्पष्टता नव्हती. त्यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार की काय असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र राज्य मंडळाने नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पुरवणी परीक्षा घेण्यासाठी प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केल्याने राज्यभरातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. दहावी आणि बारावीच्या फेर परीक्षा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये घेतल्या जाणार आहेत. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच दहावी तर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे बारावी यांच्या परीक्षा नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये होणार आहेत.
राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शासनाने लॉकडाऊन आणि संचारबंदी जाहीर केली होती. याचा कालावधी वाढल्याने मार्च 2020 मध्ये झालेल्या परीक्षांचे निकाल लागण्यासाठी जुलै 2020 हा महिना उजाडला. त्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी पुरवणी परीक्षा ही आता जुलै-ऑगस्टऐवजी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात घेण्यात येणार आहे. परीक्षेस नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजने अंतर्गत तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रं ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहेत असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.