Shrikant Shinde : संसदेत शिंदे गटाची जबाबदारी दोन शिलेदारांवर, श्रीकांत शिंदे शिवसेनेचे गटनेते तर श्रीरंग बारणे प्रतोदपदी
Shiv Sena In Parliament : एनडीएच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रीपदं मिळणार असल्याची माहिती आहे.
मुंबई : देशात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा सरकार येण्याचा मार्ग मोकळा झाला असून त्यामध्ये शिवसेना शिंदे गटालाही मोठा वाटा मिळणार आहे. शिवसेनेला केंद्रात एक कॅबिनेट तर दोन राज्यमंत्रीपदं मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि कल्याण लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार श्रीकांत शिंदे (Srikanth Shinde) यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. श्रीकांत शिंदेंची शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड झाली आहे. तर मावळचे खासदार श्रीरंग बारणे (Srirang Barane) हे पक्षाचे संसदेतील प्रतोद असतील.
लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने 15 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी 7 जागांवर शिंदे गटाचे खासदार निवडून आले. बुलढाणा, औरंगाबाद, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर पश्चिम मावळ आणि हातकलंगले या मतदारसंघांमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून विजय मिळवला आहे. मुंबई उत्तर पश्चिम मधून रवींद्र वायकर अवघ्या 48 मतांनी विजयी झाले आहेत. सर्वाधिक मताधिक घेण्यात श्रीकांत शिंदे यांचा समावेश आहे. ते दोन लाख नऊ हजार मतांनी विजयी झालेत. औरंगाबादचे संदिपान भुमरे हे एक लाख 34 हजार 650 मतांनी विजयी झाले.
शिवसेनेतून मंत्रिपदासाठी कुणाच्या नावाची चर्चा?
शिवसेना शिंदे गटाला एक कॅबिनेट तर दोन राज्यमंत्रीपदं मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी राज्यातून श्रीकांत शिंदे यांचं नाव आघाडीवर आहे. सोबतच बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांच्याही नावाची चर्चा आहे. नवीन सरकारचा शपथविधी हा रविवारी, 9 जून रोजी होणार आहे.
एनडीएचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
अर्थ, गृह, संरक्षण आणि परराष्ट्र ही चार सर्वात महत्त्वाची खाती भाजप स्वतःकडे ठेवणार आहे. प्रत्येकी 4 खासदारांच्या मागे एक कॅबिनेट मंत्रीपद देण्याचं ठरलं आहे, अशी माहिती मिळतेय. चंद्राबाबू नायडूंच्या टीडीपीचे 16 खासदार आहेत, त्यामुळे त्यांना चार कॅबिनेट मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे, तर 12 खासदार असलेल्या नितीश कुमारांच्या पक्षाला तीन मंत्रिपदं दिली जाण्याची चिन्हं आहेत. मात्र नेमकी कुठली खाती घटकपक्षांना देणार हे मात्र अजून कळू शकलेलं नाही.
ही बातमी वाचा :