Soyabean : निवडणुकीचा प्रचार 'सोयाबीन' या चार अक्षराभोवती, मराठवाडा-विदर्भातील 70 मतदारसंघात कुणाला फटका बसणार?
Soyabean MSP Rate : एकट्या मराठवाड्यात 30 लाख हेक्टरवर सोयाबीन पेरणी झाली आहे. पण सोयाबीन हमीभावापेक्षा कमी भावाने विकत असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.
छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यातील प्रचार हा सोयाबीन या चार अक्षराभोवती फिरत आहे. राज्यात 70 मतदारसंघात सोयाबीनच्या भावावर बरीच गणितं अवलंबून आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे सगळेच सोयाबीनला भाव देण्याचं आश्वासन देत आहेत. लोकसभेत सत्ताधाऱ्यांना कांद्याने रडवले, आता विधानसभेत सोयाबीनच्या पट्ट्यातील शेतकरी मतदानातून कशा पद्धतीने व्यक्त होतात ते पाहावं लागेल.
कापसाचा धंदा शेतकऱ्यांसाठी एक धागा सुखाचा तर शंभर धागे दुःखाचे असा झाला आणि शेतकरी सोयाबीनकडे वळला. मराठवाडा आणि विदर्भ सोयाबीनचे आगार आहेत. एकट्या मराठवाड्यात 30 लाख हेक्टरवर सोयाबीन पेरणी झाली. आता सोयाबीन हमीभावापेक्षा कमी भावाने विकत असल्याने सगळेच शेतकरी अडचणीत आले आहेत.
सोयाबीनची अडचण काय?
सोयाबीनचे विदर्भ, मराठवाड्यात विक्रमी उत्पन्न झालं आहे. सोयाबीनची आधारभूत किंमत 4,800 रुपये आहे. मात्र सरकारी खरेदी केंद्रे अजून सुरू झाली नाहीत. त्यामुळं शेतकऱ्याला बाजारात कमी भावाने सोयाबीन विकावं लागत आहे. यामुळे विदर्भ, मराठवाड्यातील अनेक शेतकरी यामुळे अडचणीत आहे.
धक्कादायक म्हणजे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनीच सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याची खंत व्यक्त करतायत. ही केंद्रे लवकरच सुरू व्हावीत असे आदेश दिलेत असे सांगतात.
या सगळ्यामुळे शेतकरी मात्र हवालदिल झालाय. निवडणुकांच्या काळात सत्ताधाऱ्यांना ही नाराजी परवडणारी नाही, तर विरोधक सुद्धा यावरून आक्रमक झाले आहेत. सोयाबीनला 6000 रुपये भाव देणार असल्याचा मुद्दा उद्धव ठाकरे वारंवार आपल्या सभेमध्ये सांगतात. त्यामुळं राजकारण्यांना सोयाबीनचां मोठा फटका बसण्याची चिन्हं आहेत.
14 सप्टेंबर रोजी आयात शुल्क वाढविल्यानंतर खाद्यतेलाचा प्रतिकिलो दर 45 रुपयांनी वाढला. मात्र, याच काळात मका आणि तांदळापासून इथेनॉल बनविण्यास परवानगी देण्यात आली. इथेनॉल उत्पादकांनी 60 लाख मेट्रीक टन पेंड तयार केली. मका पेंडीचा दर प्रतिकिलो 14 रुपये तर तांदूळ पेंडीचा दर 22 रुपये किलो निघाला. सोयाबीनच्या पेंडीचा दर 42 रुपये किलो होता. परिणामी सोयाबीनचे दर वाढलेच नाहीत.
सोयाबीनच्या दराचा कुठं कुठं बसू शकतो फटका?
मराठवाडा
लातूर, धाराशिव, जालना, बीड, परभणी, संभाजी नगर मधील जवळपास सर्वच मतदार संघात फटका बसू शकतो...
विदर्भ
नागपूर जिल्ह्यामध्ये 6 पैकी 3 मतदारसंघात फटका बसू शकतो. तर यवतमाळ, गडचिरोली , चंद्रपूर, वर्धा , वाशिम , अकोला , बुलढाणा इथ सर्वच मतदारसंघात फटका बसू शकतो. त्यामुळेच की काय मराठवाड्याच्या राजधानीमध्ये झालेल्या पंतप्रधानांच्या सभेमध्ये देखील सोयाबीनच्या दराचा उल्लेख नरेंद्र मोदींना करावा लागला.
लोकसभा निवडणुकीनंतर घसरलेले सोयाबीनचे दर वाढावेत म्हणून आयात शुल्कामध्ये 20 टक्के वाढ करण्यात आली. पण विधानसभा निवडणुकीत मतदानापूर्वी तीन दिवस आधी केवळ 400 रुपयांनी भाव वाढले आहेत. मात्र, हा दरही हमीभावापेक्षा 490 रुपयांची कमीच असल्याने 70 सोयाबीन उत्पादक मतदारसंघात रोष दिसतो. आता तो मतदानात रिफ्लेक्ट होतो की नाही याचे उत्तर निवडणुकीच्या निकालानंतर कळेल.
ही बातमी वाचा: