इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला
येवला मतदारसंघातून मंत्री छगन भुजबळ हे निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे माणिकराव शिंदे मैदानात आहेत.
नाशिक : राज्यातील विधानसभा निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून नेतमंडळी जोमाने कामाला लागली आहे. दुसरीकडे उपोषणकर्ते मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनीही विधानसभा निवडणुकीसंदर्भात भूमिका जाहीर करत निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, सुफडा साफ असा मंत्र जरांगे पाटील यांनी दिला आहे. त्यानुसार, आजपासून मनोज जरांगे यांचा नाशिक जिल्ह्यातील येवल्यातून सांत्वन दौरा सुरू झाला आहे. येवला-लासलगाव मतदारसंघात जरांगे पाटील यांच्या सांत्वन दौऱ्यासाठी मोठ्या प्रमाणात मराठा बांधव स्वागताला आले होते. येवला-लासलगाव मतदारसंघ हा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा बालेकिल्ला आहे. मात्र, जरांगे पाटील यांच्या दौऱ्यामुळं मंत्री छगन भुजबळ यांचं टेन्शन वाढणार असल्याचं दिसून येतंय. कारण, येथील मतदारसंघात येताच मनोज जरांगे यांनी माईक हाती घेत इथं दोघांना पाडा असं म्हटलं. त्यामुळे, जरांगे पाटील यांनी नेमकं कोणाला पाडा म्हटलं हे नाव घेतल नसलं तरी छगन भुजबळ आणि त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांच्यावर निशाणा साधल्याची चर्चा नाशिकच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. समीर भुजबळ हे नांदगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार आहेत.
येवला मतदारसंघातून मंत्री छगन भुजबळ हे निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे माणिकराव शिंदे मैदानात आहेत. त्यामुळे, येवल्यात मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढत रंगणार आहे. त्यातच मराठा आरक्षणावरून भुजबळ व जरांगे पाटील हा वाद महाराष्ट्राला माहिती असून जरांगेंच्या सांत्वन दौऱ्यावेळी मोठ्या प्रमाणात मराठा बांधवांनी स्वागताला गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. येथील मतदारसंघात येताच जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि साईनामाचा जयघोष करत जरांगे पाटील यांनी भाषणाला सुरुवात केली. त्यावेळी, इथं दोघांना पाडा असे वक्तव्य मनोज जरांगे यांनी केले, त्यावर उपस्थितांनी एकच जल्लोष केला.
येवल्यात ही माझी सांत्वन पर भेट आहे, आता रस्त्यात गाव आहे ते बाजूला सारू का, असे म्हणत जरांगे पाटील यांनी नाव न घेता टोला लगावला. कोणाला पाडा हे सांगायला मी आलो नाही, मात्र मराठा समाजाला विरोध करणाऱ्याला पाडा. आता कोणी पडत असेल तर त्यात माझा काय दोष, असे म्हणत भुजबळांच्या बालेकिल्ल्यात जरांगे यांनी भुजबळांनाच टोला लगावला आहे. येवल्यात विशेष काही नाही, येवला काही राज्याच्या बाहेर नाही. माझ्या पोटात एक आणि ओठात एक असं काही नाही. मी ठरवले तर डायरेक्ट कार्यक्रम करतो, आता एक माईक जुना झाला म्हणून दुसरा हातात घेतला. तो सारखा सारखा बिघडतो, त्यामुळे नवा हातात घेतला, माईकचे अशा रितीने उदाहरण देत जरांगेंनी भुजबळांना केलं लक्ष. कोणी बरोबर आसल्याने काही मतं पडत नाहीत, बरोबर असून कार्यक्रम होतो, असे म्हणत माझ्यासोबत मराठा असल्याचा भुजबळांच्या दाव्याचीही मनोज जरांगे यांनी खिल्ली उडविली.
सरकार स्थापन झाल्यावर उपोषण करणार
मनोज जरांगे पाटील यांचे अंदरसुल येथे जोरदार स्वागत करण्यात आले. जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी उसळळी होती. सरकार स्थापन झाल्यानंतर अंतरवालीत सामूहिक उपोषण करणार आहे. उपोषणाला मोठ्या संख्येने मराठा बांधवांनी यावे, असे आवाहन व घोषणाही जरांगे पाटील यांनी येवल्यातून केली. त्यामुळे, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांचा येवला दौरा चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.