सोलापूरच्या नर्सनं उंचावली मान; राष्ट्रीय पुरस्कारावर कोरलं नाव, दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान
परिचारिका मनिषा जाधव यांनाअविरतपणे सेवा निभावल्याबद्दल "राष्ट्रीय फोरेन्स नाईटिंगल पुरस्कार 2021 " पुरस्काराने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले.
Solapur ZP Nurse: सोलापूर जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या आरोग्य विभागात काम करणाऱ्या परिचारिका मनिषा जाधव यांनी राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरलं आहे. आरोग्य खात्यामध्ये आरोग्य परिचारिका म्हणून अविरतपणे सेवा निभावल्याबद्दल त्यांना "राष्ट्रीय फोरेन्स नाईटिंगल पुरस्कार 2021 " या पुरस्काराने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले.
12 मे 1810 हा फ्लोरेन्स नाइटिंगेल यांचा जन्म दिवस. संपूर्ण आयुष्य त्यांनी आरोग्य-परिचारिका म्हणून आरोग्य सेवेत घालवले. त्यांच्या सन्मानाप्रित्यर्थ 12 मे हा त्यांचा जन्मदिवस जगभरामध्ये "जागतिक परिचर्या दिन " म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून भारत सरकार द्वारे प्रत्येक वर्षी उत्कृष्ट आरोग्य सेवा देणाऱ्या आरोग्य परिचारिकेस "फ्लोरेन्स नाइटिंगेल" यांच्या नावाने दिला जाणारा सर्वोच्य पुरस्कार बहाल केला जातो.
आरोग्यसेवेतील चांगले काम पाहून मनिषा जाधव यांना आज हा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम 50 असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ग्रामीण भागातून शिक्षण घेवून आपल्या उत्कृष्ठ कामातून राष्ट्रपती पुरस्कारासाठी पात्र होणे ही बाब खर तर सोलापूर जिल्ह्यासाठी साठी अभिमानाची गोष्ट आहे. कारण प्रथमच आरोग्य विभागातून सोलापूर जिल्ह्यामधून या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
मनीषा जाधव यांना तालुका पातळीवर 2013 आणि 2014 मध्ये "कुटुंब-नियोजन शस्त्रक्रिये"मध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल सलग दोन्ही वर्षे "प्रथम क्रमांकाचे प्रमाणपत्र त्यावेळेचे सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार यांचे हस्ते देण्यात आले होता. त्यांनी 2017 मध्ये "जननी-सुरक्षा योजना" शस्त्रक्रियेमध्ये उत्कृष्ट काम केल्याने तालुका पातळीवरती त्या करत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रथम क्रमांक आला होता. त्यासाठीचा पुरस्कार तात्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारूड यांचे हस्ते प्रदान करण्यात आला होता. त्याशिवाय "कामा आणि अल्ब्लेस रुग्णालय मुंबई" यांचे तर्फे दिला जाणारा "आदर्श परिचारिका" हा पुरस्कार देण्यात आला होता.
मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी जाधव यांचं कौतुक करताना म्हटलं की, जाधव यांना देशपातळीवरच्या फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मला त्यांचा अभिमान वाटतो. जाधव यांच्या कामामुळे सोलापूर जिल्हा परिषदेचा देशपातळीवर सन्मान झाला आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांनी देखील जाधव यांचं कौतुक केलं आहे. सोलापूर जिल्हा आरोग्य विभागासाठी जाधव यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान होणे अभिमानास्पद बाब आहे. आरोग्य विभागाचा प्रमुख म्हणून मला याचा आनंद आहे. जाधव यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे आरोग्य विभागाची मान उंचावली आहे.