(Source: ECI/ABP News/ABP Majha)
School Reopen in Solapur: पाचवी ते आठवीची घंटा 27 तारखेला वाजणार; प्रशासन सज्ज उद्या, शिक्षकांच्या कोरोना चाचण्या पूर्ण
सध्या प्रत्येक बाकावर झिगझॅग पद्धतीने मुलांना बसविण्याचे नियोजन केल्याचे मुख्याधिकारी दिलीप स्वामी सांगत असून गरजेनुसार पहिली ते चौथीचे मोकळे वर्ग देखील यासाठी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सोलापूर : राज्यातील पाचवी ते आठवीच्या वर्गाची घंटा आता 27 जानेवारीला वाजणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील गावोगावी याची संपूर्ण तयारी पूर्ण झाल्याचे मुख्याधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले. कोरोनाचे संकट कमी होऊ लागल्यावर नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्यात आले होते. आता शालेय शिक्षण विभागाने पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु करण्याचा मोठा निर्णय घेतल्याने प्रशासनाचे संपूर्ण सूक्ष्म आराखडा बनवला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी उद्या गावोगावी प्रभातफेऱ्या काढण्यात येणार असून यामध्ये शिक्षक , कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि गावातील कोरोनमुक्त झालेले ग्रामस्थ सहभागी होणार आहेत. यामुळे पालक व विद्यार्थ्यांच्या मनात कोरोनाबाबत असलेली अनाठायी भीती संपण्यास मदत होणार आहे. राज्यात शालेय शिक्षण विभागाने पहिल्या टप्प्यात नववी ते बारावीच्या शाळा 23 नोव्हेंबरपासून कोरोनाच्या नियमावलीसह सुरु केल्या आणि यामध्ये सुदैवाने कोणताही वाईट अनुभव न आल्याने 22 हजार 204 शाळेत सध्या 22 लाख विद्यार्थी उपस्थित राहत आहेत. आता दुसऱ्या टप्प्यात पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु करताना राज्यातील 1 लाख 6 हजार 491 शाळेत 78 लाख 47 हजार विद्यार्थी शिकत आहेत. आता या शाळा सुरु झाल्यानंतर सोशल डिस्टन्स पाळत विद्यार्थ्यांना वर्गात बसवणे खरी डोकेदुखी ठरणार आहे.
सध्या प्रत्येक बाकावर झिगझॅग पद्धतीने मुलांना बसविण्याचे नियोजन केल्याचे मुख्याधिकारी दिलीप स्वामी सांगत असून गरजेनुसार पहिली ते चौथीचे मोकळे वर्ग देखील यासाठी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शाळेची घंटा वाजण्यापूर्वी गेल्या आठवड्यापासून या सर्व शाळांची सफाई व निर्जंतुकीकरणाची मोठी मोहीम हाती घेण्यात आली होती. यानंतर राज्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचण्याही जवळपास पूर्ण करण्यात आल्या असून शाळेत विद्यार्थी येण्यापूर्वी सर्व कर्मचाऱ्यांची तपासणी झालेली असणार आहे. या मुलांना शास्त्र , गणित व इंग्रजी या तीन विषयाचे शिक्षण सुरु केले जाणार असल्याने विद्यार्थ्यांना मोजकेच दप्तर, नाकाला मास्क आणि स्वतःची पाण्याची बाटली घरून घेऊन यावी लागणार आहे.
पालकांना कोरोनासाठी असणाऱ्या सूचना व नियमावलीची माहिती दिली जाणार असून घरीही मुलांना याची जाणीव पालकांनी करून द्यायची आहे. पहिल्या आठ दिवसात शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षण विभाग आणि आरोग्य विभाग एक दिवसाआड शाळांना भेटी देऊन माहिती घेणार आहेत. आपत्कालीन परिस्थिती आल्यास तोंड देण्यासाठी प्रशासनाने अतिशय सूक्ष्म आराखडा तयार ठेवला आहे. एकंदर नववी ते बारावीच्या अनुभवामुळे प्रशासनाचा आत्मविश्वास बळावला असून याच जोरावर पाचवी ते आठवीची शाळा देखील व्यवस्थित सुरु होईल, असा विश्वास दिलीप स्वामी याना वाटतो. सोलापूर जिल्ह्यात दोन हजार शाळांमध्ये 3 लाख 4 हजार विद्यार्थी पाचवी ते आठवीचे शिक्षण घेत असून 8157 शिक्षक हे कोरोना चाचणी करून शिकवण्यासाठी सज्ज झाले आहेत.