Solapur : साडेसात लाखांची लाच घेताना सहायक पोलीस निरीक्षक लाचलुचपत विभागाच्या ताब्यात
दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातून सोडवण्यास मदत करतो म्हणून सोलापुरातल्या सहायक पोलीस निरीक्षकाने एका व्यक्तीकडून साडेसात लाखांची लाच मागितली होती.
सोलापूर : दाखल गुन्ह्यात मदत करतो म्हणून साडेसात लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या सहायक पोलिस निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ ताब्यात घेतलं आहे. रोहन खंडागळे असं अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक संपत पवार यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे.
सोलापुरातील सलगर वस्ती पोलीस ठाण्यात मुरूम चोरी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे यांच्याकडे होता. मात्र गुन्ह्यात जप्त करण्यात आलेले डंपर सोडण्यासाठी तसेच आरोपीला अटक न करण्यासाठी रोहन खंडागळे यांनी 10 लाख रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती साडेसात लाख रुपये द्यायचे ठरले. लाचेचे हे पैसे घेण्यासाठी सोलापुरातील जुना पुणे नाका परिसरात सहायक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे गेला होता. तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिल्याने आधीच याठिकाणी सापळा रचण्यात आला होता.
सहायक पोलीस निरीक्षक खंडागळे पैसे स्वीकारण्यासाठी आल्यानंतर लाचलुचपत विभागाने त्याला रंगेहाथ पकडले. यावेळी त्याची चौकशी केली असता हे पैसे पोलीस निरीक्षक संपत पवार यांच्या सांगण्यावरून त्यांच्यासाठी स्वीकारत असल्याची कबुली त्याने दिली. त्यावरून लाचलुचपत विभागाने पोलीस निरीक्षक संपत पवार आणि सहायक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे या दोघांनाही ताब्यात घेतलं आहे. तसेच या दोघांच्या विरोधात फौजदार चावडी पोलीस स्थानाकात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
दरम्यान पोलीस निरीक्षक संपत पवार आणि सहायक पोलिस निरीक्षक रोहन खंडागळे यांच्याविरोधात कारवाई होताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे दोघांच्या ही घरात झडती घेण्यात आली. रात्री उशिरापर्यंत झडती घेण्याचे काम सुरूच होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपधीक्षक संजीव पाटील, पोलीस निरीक्षक कविता मुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
चारच महिन्यात निवृत्त होणार होते संपत पवार
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे कारवाई करण्यात आलेले सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत पवार हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांनी वादग्रस्त ठरले आहेत. पवार यांनी पोलीस खात्यात जवळपास 32 वर्षे सेवा बजावली आहे. सोलापुरात रुजू झाल्यांनातर अडीच वर्षांपूर्वी त्यांनी सलगर वस्ती पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला. अवघ्या चार महिन्यात त्यांची निवृत्ती देखील होती. मात्र निवृत्तीपूर्वीच लाचखोरीच्या गुन्ह्यात ते अडकले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- विमानतळ नामकरणाबाबत केंद्र सरकारनं धोरण निश्चित करावं; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
- Indian Railway : रेल्वे कर्मचाऱ्यांनाही आता दोन शिफ्ट; पदभार स्वीकारताच रावसाहेब दानवेंचा शिस्तीचा कार्यक्रम
- Maharashtra Corona Cases : राज्यात शुक्रवारी 10, 458 रुग्णांना डिस्चार्ज, 8,992 रुग्णांची भर; 36 शहरं-जिल्ह्यांमध्ये एकही मृत्यू नाही