Solapur : स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन खून करणारा बाप, त्याला मदत करणाऱ्या आईला फाशी; सोलापूर न्यायालयाचा पाच महिन्यात निकाल
Solapur Crime : मुलीचा खून करुन मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी रेल्वेतून राजस्थानला निघालेल्या आई आणि बापाला अटक करण्यात आली होती.
सोलापूर: स्वत:च्या अल्पवयीन चिमुकलीवर अत्याचार करून खून करणाऱ्या नराधम बापास आणि या कृत्यात मदत करणाऱ्या आईस फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपी वडील आणि आई या दोघांना सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. 3 जानेवारी 2022 रोजी सिकंदराबाद येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला होता.
जानेवारी महिन्यात आई-वडील आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना सोलापुरात उघडकीस आली होती. स्वत:च्या मुलीवर बापानेच बलात्कार केला आणि तिचा खून केला. नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह घेऊन नराधम आईबाप सिकंदराबादवरुन राजस्थानच्या दिशेने निघाले होते. मात्र रेल्वेतील सहप्रवाशांना शंका आल्याने पोलिसांकडे तक्रार केली. सोलापुरात ही घटना उघडकीस आली आणि 4 जानेवारी 22 रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात गेले होते.
अवघ्या 9 दिवसात तब्बल 31 साक्ष सरकारी पक्षाच्या तपासण्यात आल्या. रेल्वेत प्रवास करणाऱ्या एका महिलेची नेपाळवरून देखील साक्ष घेण्यात आली. गुन्हा अतिशय गंभीर आणि क्रूर असून कोणतीही दया दाखवू नये असा युक्तिवाद सरकारी पक्षाच्या वतीने करण्यात आला होता. सरकारी पक्षाचा हा युक्तिवाद ग्राह्य धरत जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायधीश यू. एल. जोशी यांनी या नराधम आई-बापाला फाशी देण्याचा निकाल दिला.
काय घडलं होतं?
स्वत:च्या मुलीवर बलात्कार करुन नराधम बापाने तिचा खून केला. त्यानंतर या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो नराधम बाप आण या कामात त्याला साथ देणारी आई, दोघेही रेल्वेमधून राजस्थानला निघाले. बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना सोलापूर रेल्वे स्थानकावर उघड झाली.
त्या मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार आणि हत्येची माहिती आरोपी आईने लपवली. हे दोघेही सिकंदराबाद- राजकोट एक्स्प्रेसमधून प्रवास करत होते. सिकंदराबादमध्ये मुलीवर अत्याचार करुन खून केल्यानंतर राजकोटला निघाले होते. मृत मुलीचा देह घेऊन जात असताना सहप्रवाशाना शंका आली. प्रवाशांच्या तक्रारीवरून सोलापुरात रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर धक्कादायक घटना उघडकीस आली. त्यानंतर आरोपीवर अत्याचार, हत्यासह पोक्सो कायद्यानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला.