(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hijab Controversy: हिजाबचा वाद निरर्थक, राजकीय आणि धर्मवादी संघटनांकडून तेल ओतण्याचं काम : शमसुद्दीन तांबोळी
हिजाबच्या मुद्यावरुन सध्या वादंग निर्माण झाले आहे. या प्रकरणावर सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक शमसुद्दीन तांबोळी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा सगळा वाद निरर्थक असल्याचे तांबोळी म्हणालेत.
Hijab Controversy : कर्नाटकमध्ये हिजाबच्या मुद्यावरून मोठं वादंग निर्माण झाले आहे. देशभरामध्ये याचे पडसाद उमटाताना दिसत आहेत. महाराष्ट्रात देखील याचे पडसाद उमटत आहेत. महाराष्ट्रातून या प्रकरणावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. या प्रकरणावर सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक शमसुद्दीन तांबोळी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटकमधील वाद हा महाराष्ट्रात पसरतोय. काही मुस्लिम संघटनांनी तर हिजाब दिवस पाळायचा ठरवले आहे, हे निरर्थक असल्याचे शमसुद्दीन तांबोळी यांनी म्हटले आहे. कुराणमधे हिजाब किंवा बुरख्याची सक्ती नाही असे देखील तांबोळी म्हणालेत. हिजाब प्रकरणात राजकीय आणि धर्मवादी संघटनांनी तेल ओतले आहे. त्याचा वणवा महाराष्ट्रात आला असल्याचे तांबोळी म्हणाले.
इथे कायद्याचे राज्य आहे अस म्हणतो, विज्ञानवादी समाजात अशा काळात कालविसंगत ठरणाऱ्या गोष्टींना बढावा देत आहेत. हिंदू संघटनांन छेडण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही एका बाजूला संविधान मानतो आणि दुसऱ्या बाजूला अशा गोष्टी करतो असे ते म्हणाले. तुर्कस्तान, सिरिया यासह अनेक इस्लामिक देशांमधे बुरख्याची सक्ती नाही. पाकिस्तानच्या पंतप्रधान राहिलेल्या बेनझीर भुट्टो किंवा बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी कधीही बुरखा घातलेला नाही. अरबस्तानात धुळ आणि उन यामुळे स्त्री आणि पुरुष दोघेही संपुर्ण अंग झाकणारा पोषाख परिधान करतात. इतर ठिकाणी बुरख्याची सक्ती करणं निरर्थक असल्याचे तांबोळी म्हणाले. हिंदुत्ववादी संघटनांनी हा विषय पेटवला असल्याचे तांबोळी यावेळी म्हणाले.
आज हिजाब मेरी शान है, हिजाब मेरी पहचना है अशी पोस्टरे घेऊन महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. तर मालेगावमध्ये आज हिजाब दिन पाळण्यात येत आहे. हिजाबच्या समर्थनासाठी महिला रस्त्यावर येताना दिसत आहेत. मात्र, हा वाद अनाठायी वाद आहे. हा विषय कर्नाटकमधील शिक्षणसंस्थेपुरता मर्यादीत आहे. सर्वत्र हा विषय पसरवला जात असून, हे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. राजकीय आणि धर्मवादी संघटनांनी तेल ओतले आहे. त्याचा वणवा महाराष्ट्रात आला आहे. मालेगावमध्ये आज हिजाब दिन पाळण्यात येत आहे. राजकीय पक्ष यामध्ये उड्या घेत आहेत. त्यामुळे सामाजिक सुधारणा आणि विकासाच्या विषयांना बगल देण्यात येत आहे, हे दुर्दैवी असल्याचे तांबोळी म्हणाले. कुराणमध्ये हिजाबद्दल काहीही सांगितले नाही. सभ्य कपडे वापरावे असे सांगतिले आहे. बुरखा हा इस्लामचा अविभाज्य घटक नाही, याला अस्मितेचा विषय केला जात आहे. हे प्रगतीच्या आड येत असल्याचे तांबोळी म्हणाले.
दरम्यान, शिक्षणसंस्थांमध्ये धार्मिक पोशाख नको, अशी सूचना कर्नाटक उच्च न्यायालयानं केली असली तरी हिजाब प्रकरणाचे पडसाद अजूनही उमटत आहेत. मालेगावमध्ये आज हिजाब दिन पाळण्यात येणार आहे. त्याआधी गुरुवारी मालेगावातल्या मैदानात हजारो महिलांनी एकत्र येऊन हिजाबचं समर्थन केलं. या मेळाव्यात मौलानांनी महिलांना मार्गदर्शन केलं. आज हिजाब दिनानिमित्त हिजाब परिधान करूनच घराबाहेर पडण्याचा निर्णय या महिलांनी जाहीर केलाय. दुसरीकडे जालन्यातही काल मुस्लिम महिलांनी हिजाबच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने केली. या मोर्चात शेकडो मुस्लिम महिला सहभागी झाल्या होत्या. बुलडाणा शहरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेत. कर्नाटकात एका शैक्षणिक संस्थेकडून मुस्लीम मुलींच्या हिजाबवर बंदी घालण्यात आली. याचा निषेध करण्यासाठी बुलढाणा शहरात आज मोर्चा, निदर्शने आणि आंदोलनाची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेत.
महत्त्वाच्या बातम्या: