औरंगाबाद, जळगावात आढळल्या सापासारख्या दिसणाऱ्या अळ्या; नागरिकांमध्ये दहशत
पाच फुटांपासून ते 100 फुटांपर्यंत अळ्यांची ही रांग आहे. एकावर एक अशा लाखो अळ्या एका रांगेत चालतात. मात्र नागरिकांनी घाबरुन जावू नये असं आवाहनही शास्त्रज्ञांनी केलं आहे.

औरंगाबाद/जळगाव : औरंगाबाद आणि जळगावमध्ये एक अनोळखी अळी पाहायला मिळत आहे. झुंडीने चालणारी अळी सध्या चर्चेचा विषय बनली आहे. लांबून पाहिल्यास साप असल्याचा भास होतो, मात्र जवळून पाहिल्यावर छोट्या अळ्या असल्याचं लक्षात येतं. अशा अळ्या यापूर्वी ग्रामस्थांनी पाहिल्या नसल्यानं भीती आणि कुतूहल निर्माण झालं आहे. नव्याने दिसलेल्या या अळ्या तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्या आहेत.
औरंगाबादमधील गंगापूर तालुक्यातील वजनापूर येथे या अळ्या आढळल्या होत्या. पाच फुटांपासून ते 100 फुटांपर्यंत अळ्यांची ही रांग आहे. एकावर एक अशा लाखो अळ्या एका रांगेत चालतात. धक्कादायक म्हणजे सध्या घराच्या बाहेर या अळ्या दिसत आहेत. मात्र घरात येण्याच्या भीतीने नागरिक जास्त घाबरले आहेत. नागरिकांनी या अळ्यांना संपवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या वाढतच चालल्याचं दिसून येत आहेत.
औरंगाबादनंतर जळगावमधील काही भागातही या अळ्या पाहायला मिळाल्या आहेत. शहरातील गणेश कॉलनी परिसरातील एका बागेत या अळ्या आढळल्या. सापाच्या आकाराने चालत असलेल्या लाखो अळ्यांचा कळप निघाल्याने बघ्यांची मोठी गर्दी या ठिकाणी जमली होती. पहिल्यांदा अशा प्रकारच्या अळ्या दिसून आल्याने संपूर्ण शहरात चर्चेचा विषय बनला आहे.
फंगस गॅन्ट (Fungas gant) असं या अळीचं नाव आहे. सडलेल्या, कुजलेल्या पदार्थावर वाढलेल्या बुरशीवर ही आळी उपजीविका करते. शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. कारण ही आळी कोणत्याही पिकाचे नुकसान करत नाही. केवळ एक महिना या अळीचं जीवन असतं. सुरुवातीला ही अळी अंड्याच्या स्वरूपात असते. 4 ते 5 दिवसात छोट्या आळीत त्याचं रुपांतर होतं. 10 ते 14 दिवसानंतर ही अळी मोठी होते. त्यानंतर 4 ते 7 दिवसात या अळीचं रुपांतर पंख आलेल्या किड्यात होते आणि तीचं आयुष्य संपते.
नागरिकांनी घाबरु नका
फंगसवर्म प्रकारातील या अळ्या असल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं. नागरिकांनी घाबरुन जावू नये, असं आवाहनही शास्त्रज्ञांनी केलं आहे. काही दिवसात या अळ्या स्वत:हून कमी होतील, असंही तज्ज्ञांनी सांगितलं आहे. अगदी पाणी टाकलं तरी अळ्या वाहून जातील, असं शास्त्रज्ञांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
