भाकरीवर रेखाटले बाबासाहेबांचे चित्र, महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवाला अनोखे अभिवादन
यंदाचा महापरिनिर्वाण दिनही कोरोनाच्या सावटाखाली असल्याने अनुयायांनी चैत्यभूमीवर गर्दी न करण्याचे आवाहन राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेच्यावतीनं करण्यात आले आहे.
Mahaparinirvan Din : उद्या (6 डिसेंबर) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा महापरिनिर्वाण (Mahaparinirvan Din) दिन असल्याने देशभरातील अनुयायी विविध पद्धतीने त्यांना अभिवादन करणार आहेत. दादरच्या चैत्यभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येत असल्याने आधीच राज्य सरकार आणि मुंबई पालिकेने गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे भारती विद्यापीठ प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, नवी मुंबई शाळेतील कलाशिक्षक नरेश मारुती लोहार यांनी अनोख्यारित्या बाबासाहेबांना अभिवादन केले आहे.
लोहार यांनी ज्वारीच्या भाकरीवर डॉ. बाबासाहेबांच्या सहीसह त्यांचे चित्र रेखाटले आहे. हा अनोखा प्रयोग करून डॉ. बाबासाहेबांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त लोहार यांनी अभिवादन केले आहे. 'आपण खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय र हे गीत बरचं गाजलं होतं. जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी आणि एक रुपयाचं पुस्तक घ्या ,या त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन कलाशिक्षक लोहार यांनी 9 इंच व्यासाच्या ज्वारीच्या भाकरीवर चित्र काढून त्यांना अभिवादन केल्याचं सांगितलं आहे.
मुंबईत येणाऱ्या अनुयांसाठी रेल्वेकडून विशेष सुविधा
महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरमध्ये येणाऱ्या अनुयायांसाठी मध्य रेल्वेने (Central Railway) विशेष सुविधांचे नियोजन केले आहे. 5 आणि 6 डिसेंबरच्या मध्यरात्री छत्रपटी शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल स्थानकांदरम्यान मध्य रेल्वे प्रवासाठी आठ उपनगरीय विशेष गाड्या सर्व स्थानकांवर थांबणार आहेत. यामध्ये मुख्य लाइनवर अप विशेष कल्याण-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- विशेष कल्याण येथून रात्री एक वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रात्री अडीच वाजता पोहोचेल. त्यानंतर कल्याण-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष कल्याण येथून रात्री 2.15 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पहाटे 3.45 वाजता पोहोचेल. याबरोबरच मेन लाइनवर डाऊन विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री दीड वाजता सुटेल आणि कल्याण येथे रात्री तीन वाजता पोहोचेल. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण विशेष ही गाडी सीएसटी वरून रात्री अडीच वाजता सुटेल आणि कल्याणला पहाटे चार वाजता पोहोचेल. हार्बर लाइनवर अप विशेष पनवेल-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष पनवेल येथून रात्री 1.15 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रात्री 2.35 वाजता पोहोचेल. पनवेल- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष पनवेल येथून रात्री 2.30 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पहाटे 3.50 वाजता पोहोचेल.
हार्बर लाइनवर डाउन विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- पनवेल विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री 1.40 वाजता सुटेल आणि पनवेल येथे रात्री 3.00 वाजता पोहोचेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री 2.40 वाजता सुटेल आणि पनवेल येथे पहाटे चार वाजता पोहोचणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील अनुयायांना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आवाहन केले आहे की, मुंबईतील अनुयायांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ऑनलाइन अभिवादन करावे. बाहेरून येणारे आनुयायी पाहता कोरोना नियमांचे पालन करावे. फार गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रोनचेही संकट समोर आहे. ऑनलाइन अभिवादन दिवसभर सुरू राहणार आहे. महानगरपालिका सज्ज आहे, असे महापौर म्हणाल्या.