खा.विनायक राऊत यांच्या मुलाची पोलिसांना शिवीगाळ आणि धमकी, निलेश राणेंचा आरोप, व्हिडीओ शेअर
काही दिवसांपूर्वी गुजरातच्या सूरतमध्ये कायदा मोडल्याने महिला कॉन्स्टेबलने थेट राज्यमंत्र्यांनाच जाब विचारला होता. त्यांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. शिवाय त्यांचं कौतुकही झालं होतं.आता माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा मुलगा ड्युटीवर असलेल्या पोलिसांना शिवीगाळ करत धमकी देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
सिंधुदुर्ग : शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या मुलाने कणकवलीच्या मुख्य चौकात ड्युटीवर असलेल्या पोलिसांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत धमकी दिल्याचा आरोप करत माजी खासदार निलेश राणे यांनी एक व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. भरपावसात पोलीस ड्यूटी करत आहेत आणि खासदाराचा मुलगा दारु पिऊन शुद्धी नसल्यासारखा त्याला शिव्या देतोय असं राणेंनी म्हटलं आहे. दारु पिऊन गाडी चालवली तर पोलीस पकडणारच, असंही निलेश राणे म्हणाले.
या व्हिडीओमध्ये विनायक राऊत यांचा मुलगा गीतेश राऊत यांनी वाहतूक पोलीस विश्वजित परब यांच्याशी भर रस्त्यात हुज्जत घालत असल्याचं दिसत आहे. मी विनायक राऊत यांचा मुलगा आहे. तुला सोडणार नाही, असंही गीतेश राऊत बोलत आहेत.
कायदा मोडल्याने महिला कॉन्स्टेबलने थेट राज्यमंत्र्यांना जाब विचारला; व्हिडीओ व्हायरल
हा व्हिडीओ शेअर करताना निलेश राणे यांनी लिहिलं आहे की, "शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्या मुलाने एका पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली. भर पावसात एक पोलीस कर्मचारी आपलं कर्तव्य बजावत आहे. खासदाराचा मुलगा दारु पिऊन शुद्धीत नसल्यासारखा त्याला धमकी देतो. दारु पिऊन गाडी वेडीवाकडी चालवली तर पोलीस पकडणारच. याप्रकरणी संबंधित तरुणाविरोधात कलम 353 आणि 185 अंतर्गत गुन्हा दाखल व्हायला हवा."
एबीपी माझाशी बोलताना राऊत आणि राणे यांच्यात खडाजंगी
"जे कोणी आरोप करत आहेत की दारु पिऊन गाडी चालवत होता, माझा मुलगा साधी सुपारी सुद्धा करत नाही. तरी देखील मी पोलीस अधीक्षकांना घटनेची निपक्ष चौकशी करुन जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा, असं सांगितलं आहे. जर मुलगा दोषी तर त्याच्यावर कारवाई करा. पण जर दोषी नसेल तर जो पोलीस उद्धटपणे बोलला असेल तर त्यांनाही तसाच समज द्या," अशी प्रतिक्रिया विनायक राणे यांनी एबीपी माझाला दिली. तसंच गाडीत 100 टक्के मुलगाच होता आणि गाडी त्याचीच असल्याचं विनायक राऊत यांनी म्हटलं.
गुजरातची 'ती' महिला पोलीस कॉन्स्टेबल नोकरी सोडून IPS अधिकारी बनणार, पोलीस आयुक्तांची घेतली भेट
"आधी तक्रार झाली पाहिजे, तक्रारच नोंदवली नसेल तर चौकशी कशी करणार? ज्या भाषेत विनायक राऊतांचा मुलगा धमकी देतोय, यावरुन तो प्यायलेला दिसतोय, जरी प्यायलेला नसेल तर सत्तेच्या मस्तीमध्ये आहे. कारण सत्ता त्यांची आहे. आपण काहीही करु शकतो अशी भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे," असं निलश राणे यांनी म्हटलं.
Vinayak Raut's son abused Police | शिवसेना खासदार विनायक राऊतांच्या मुलाकडून पोलिसाला शिवीगाळ, निलेश राणेंचं ट्वीट