(Source: ECI/ABP News/ABP Majha)
संतोष परब हल्लाप्रकरणी नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?
Sindhudurg News : संतोष परब हल्लाप्रकरणी नितेश राणेंच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार असून या प्रकरणात गुंतवत असल्याचा राणे-पिता पुत्रांचा आरोप आहे. तर नितेश राणेंवर कारवाईसाठी शिवसेना आग्रही आहे.
Sindhudurg News : कणकवलीत काही दिवसांपूर्वी एका शिवसैनिकावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे (Nitesh Narayan Rane) यांना अटक होण्याची शक्यता आहे. खुद्द नितेश राणेंचे वडिल आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनीच ही शक्यता व्यक्त केली आहे. या प्रकरणात नितेश राणेंना नाहक गोवलं जातंय, असा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच या प्रकरणी नितेश राणेंविरोधात शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणातील सूत्रधाराला अटक करा, अशी मागणी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी केली आहे.
सिंधुदुर्गात पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध राणे संघर्ष पेटला आहे. कणकवलीत संतोष परब या शिवसैनिकावर झालेल्या हल्ल्याप्रकरणात भाजपचे आमदार नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता आहे. खुद्द नारायण राणे यांनीच ही शक्यता वर्तवली, तर शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी या प्रकरणी नितेश राणेंना अटक करण्याची मागणी केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेनेचे सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्यात थेट सामना होत आहे. संतोष परब हल्ला प्रकरणात सत्ताधारी आघाडी नितेश राणेंना गोवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केला आहे. तर राणेंच्या आरोपांनंतर आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी या हल्ला प्रकरणातल्या सूत्रधारावर कारवाईसाठी पोलीस ठाण्यात मोर्चा काढायचं ठरवल्यानं शिवसेना आणि राणे समर्थक आमनेसामने येण्याची शक्यता आहे.
काय आहे प्रकरण?
18 डिसेंबरला संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते. या हल्ल्यात परब जखमी झाले होते. या प्रकरणाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकिय शत्रुत्वाची पार्श्वभूमी असल्याच्या संशयावरून पोलिसांनी भाजपच्या गोटात चौकशीची सूत्रे हलवली आहेत. मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी दिल्लीतून अटक करण्यात यश मिळवले आहे. सातपुते हा भाजप आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे या प्रकरणात नितेश राणेंची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
सुडाच्या राजकारणातून नितेश राणेंच्या अटकेसाठी प्रयत्न : नारायण राणे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 4 नगर पंचायती व जिल्हा बँकेवर भाजपची सत्ता येते हे लक्षात आल्यानंतर सूड भावनेने आघाडी सरकार कारवाई करत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. कणकवलीमध्ये घडलेल्या मारहाणीच्या घटनेमध्ये भाजपचे आमदार नितेश राणे आणि गोट्या सावत यांचा संबंध लावून पोलीस अधिकाराचा गैरवापर करून नितेश आणि माजी जिल्हा अध्यक्ष संदेश सावंत यांना चौकशीसाठी बोलून अटकेसाठी प्रयत्न करत आहेत असा आरोप नारायण राणे यांनी केला आहे.
कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत नारायण राणे बोलत होते. यावेळी नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर कडाडून टीका केली. महाराष्ट्रातील आघाडी सरकार हे बळाचा आणि अधिकाराचा गैरवापर करून नाहक प्रकरणात आमदार नितेश राणे यांना गोवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे पोलिसांनी लक्षात ठेवा केंद्रामध्ये पण आमची सत्ता आहे. जर चुकीच्या पद्धतीने पोलीस वागत असतील तर जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयावर भव्य मोर्चा काढू. त्यामुळे पोलिसांनी अधिकाराचा गैरवापर करू नये असा सूचक इशारा नारायण राणे यांनी यावेळी दिला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- नवाब मलिक, नितेश राणेंच ट्वीट वादात,महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा विसर
- शिवसेनेचं जे काही असतं ते अगदी खुलं असतं : आदित्य ठाकरे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह