(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sugarcane Crushing : परतीच्या पावसाने हाहाकार केल्याने ऊस गळीत हंगाम आणखी लांबण्याची चिन्हे
Sugarcane Crushing : कोल्हापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाने ऑक्टोबर महिन्यातील जवळपास तीन आठवडे सलग दणका दिल्याने ऊस गळीत हंगाम आणखी लांबण्याची चिन्हे आहेत.
Sugarcane Crushing : कोल्हापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाने ऑक्टोबर महिन्यातील जवळपास तीन आठवडे सलग दणका दिल्याने ऊस गळीत हंगाम आणखी लांबण्याची चिन्हे आहेत. गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर शहर परिसरासह जिल्ह्यात पूर्णत: उघडीप दिली असली, तरी झालेल्या पावसाने शेतांमध्ये अजूनही पाणी साचून आहे.
कोल्हापुरात नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदारांच्या चिंतेत भर पडली आहे. शेतातील पाणी कमी झाल्याशिवाय ऊसतोड मजुरांना ऊसतोड करून वाहतूक करणे अशक्यप्राय आहे. त्यामुळे गळीत हंगामासाठी विविध भागांतून स्थलांतरित झालेल्या मजुरांना कामाला सुरुवात करण्यासाठी हिरवा कंदील मिळण्याची वाट पाहत बसावे लागत आहे.
ऊसाचा गळीत हंगाम सुरु होण्यास आणखी उशीर झाल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. वजन आणि उताऱ्यावर परिणाम झाल्याने नुकसान होणार आहे. हंगामाला उशिरा प्रारंभ झाल्याने अर्थातच गळीत हंगाम लांबणार यात शंका नाही. त्यामुळे अतिरिक्त ऊसासह शेवटच्या टप्प्यात ऊसतोड मजूर आपल्या गावी परतल्यास परिस्थिती बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एकरकमी एफआरपी व जादा 350 रुपयांसाठी स्वाभिमानीचा आक्रमक पवित्रा
दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी एकरकमी एफआरपीसह व जादा 350 रुपये दिल्याशिवाय ऊसाच्या कांडाला हात लावू देणार नाही, असा सज्जड इशारा जयसिंगपूरमध्ये झालेल्या ऊस परिषदेत दिला होता. या मागणीनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आतापर्यंत शिरोळ तालुक्यातील तिन्ही कारखान्यांची ऊस वाहतूक बंद पाडण्यात आली आहे.
शिरोळ तालुक्यातील गुरुदत्त शुगर, घोडावत जॅगरी तसेच शिरगुप्पे शुगर कारखान्याची ऊस वाहतूक आतापर्यंत स्वाभिमानीने रोखली आहे. ऊस परिषदेत चालू गळीत हंगामात एकरकमी एफआरपीसह अधिकचे 350 रुपये प्रतिटन पहिली उचल द्यावी, गतवर्षीच्या ऊसाची एफआरपी अधिक 200 रुपये तातडीने जमा करावेत, कारखान्यांचे वजनकाटे ऑनलाईन करा यासह 13 ठराव मंजूर करण्यात आले होते.
डी. वाय. पाटील कारखान्याकडून पहिली उचल प्रतीटन 3 हजार जाहीर
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखान्यकडून चालू हंगामात पहिली उचल प्रतिटन ३ हजार रुपये दिली जाणार आहे. हसन मुश्रीफ यांनीही एकरकमी एफआरपी देण्याची घोषणा केली आहे. मात्र, राजू शेट्टी यांनी घेतलेल्या भूमिकेवरून अन्य कारखानदार काय मार्ग काढणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या