शिवसेनेने कोणत्याही पर्यायाचा विचार न करता भाजपसोबतच सत्ता स्थापन करावी : रामदास आठवले
महायुतीला जनतेने बहुमताने निवडून दिलं. मात्र तरीही महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणे हे फार चांगलं नाही, असं मत रामदास आठवले यांनी व्यक्त केलं. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेससोबत योग्य दिशेने चर्चा चालू आहे असं म्हटलं आहे.
मुंबई : राज्यातील सत्तेचा तिढा अद्याप कायम आहे. सरकार स्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रयत्न करत आहे. तिन्ही पक्षांमध्ये त्यासाठी चर्चा सुरु असल्याचं त्यांचे नेते सांगतं आहेत. मात्र शिवसेनेने अन्य कोणत्याही पर्यायांचा विचार न करता भाजपसोबतच सत्ता स्थापन करावी, असं भाजपचा मित्रपक्ष रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
भाजपने देखील दोन पाऊल मागे जाऊन महाराष्ट्राच्या हितासाठी शिवसेनेसोबत तडजोड करुन सत्ता स्थापन करावी. शिवसेना-भाजपची 30 वर्ष जुनी युती आहे. या दोन्ही पक्षांना एकत्र आणून त्यांच्यात दिलजमाई करण्याचा मी प्रयत्न करणार आहे, असं रामदास आठवले यांनी सांगितलं आहे. मुंबईत आल्यानंतर भाजपचे विधिमंडळ नेते देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिवसेनेचे विधिमंडळ नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
महायुतीला जनतेने बहुमताने निवडून दिलं. मात्र तरीही महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणे, हे फार चांगलं नाही, असं मत रामदास आठवले यांनी व्यक्त केलं. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेससोबत योग्य दिशेने चर्चा चालू आहे असं म्हटलं आहे. मात्र त्यांची काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडी सोबत युती करण्याची दिशा चुकीची आहे. त्यांनी राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी चर्चा करण्याची योग्य दिशा भाजप आहे. कार्यकर्त्यांना सत्ता देण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. त्यामुळे भाजप-शिवसेनेमध्ये दिलजमाई करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, असं रामदास आठवले म्हणाले.
शिवसेना-भाजपमध्ये निवडणुकीपूर्वी युती झाली होती. मात्र निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री पदावरुन दोन्ही पक्षांमध्ये बिनसलं. भाजपने अडीच-अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता, असं शिवसेनेकडून सांगितलं जात आहे. तर शिवसेनेला असा शब्द दिल्या नसल्याने मुख्यमंत्रीपदाबाबत तडजोड होणार नाही, अशी भूमिका भाजपने घेतली. त्यामुळे राज्यात सत्तेचा पेच निर्माण झाला.
अखेर राज्यपालांनी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या मोठ्या पक्षांना सत्ता स्थापन करण्याची संधी दिली. मात्र कोणताही पक्ष सत्ता स्थापनेचा दावा करु न शकल्याने राज्यपालांनी राज्यात राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. त्यानंतर अखेर 12 नोव्हेंबरला राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.