Yuvasena : पूर्वेश सरनाईक यांची शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेनेच्या कार्याध्यक्षपदी निवड, एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्ती
Purvesh Sarnaik : राज्यभरात युवा सेना वाढणार, लवकरच युवा सेना बांधणी दौरा करणार असल्याची प्रतिक्रिया सर्वेश सरनाईक यांनी दिली आहे.
ठाणे : युवा नेते पूर्वेश प्रताप सरनाईक (Purvesh Sarnaik) यांची शिवसेना पक्षाच्या अंगीकृत युवा संघटना असलेल्या 'युवा सेना' (Yuva Sena) कार्याध्यक्ष या पदावर निवड करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्वतः ही निवड केली असून त्यांच्याच शुभहस्ते पूर्वेश सरनाईक यांच्यावर कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन युवा सेनेच्या नव्याने बांधणीला सुरुवात करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात युवा सेना मजबूत व बळकट करून युवकांचे प्रश्न त्या माध्यमातून सोडवा , युवकांचा आवाज बना अशा शुभेच्छा यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या.
लवकरच संपूर्ण राज्यभर दौरा करून आता युवा सेना नव्याने बांधण्याचे काम पूर्वेश सरनाईक व त्यांचे सहकारी करणार आहेत. पूर्वेश सरनाईक हे महाविद्यालयीन दिवसांपासून सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत. वयाच्या 16 व्या वर्षी त्यांनी भारतीय विद्यार्थी सेनेचे सदस्यत्व घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर काम केले होते व युवकांच्या प्रश्नावर आवाज उठवला होता. त्यानंतर वयाच्या 25 व्या वर्षी ठाणे महापालिका नगरसेवक म्हणून ते निवडून आले. युवकांसाठी करियर मार्गदर्शन, विद्यार्थ्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य व मार्गदर्शन, युवा कला- क्रीडा महोत्सव, जॉब फेअर , नुकतेच पहिल्यांदाच प्रो गोविंदा स्पर्धेचे यशस्वी आयोजन यासह अनेक नवनवीन उपक्रम त्यांनी आजवर राबवले आहेत. युवकांशी थेट संवाद आणि युवकांच्या प्रश्नांची त्यांना उत्तम जाण आहे. याआधी त्यांनी युवा सेना विस्तार करण्यासाठी राज्यात काही जिल्ह्यांचा दौरा केला आहे. त्यामुळे आता युवा सेनेचे कार्याध्यक्ष ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी सोपवली आहे.
युवकांचे प्रश्न सोडविणार, युवा सेना मजबूत करणार
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री.बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांनी आज माझी युवासेनेच्या कार्यध्यक्षपदी निवड करुन माझ्यावर मोठी जबाबदारी दिली आहे, त्याबद्दल मी आदरणीय शिंदे साहेबांचा ऋणी आहे. साहेबांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मी युवा सेना बळकट करून सार्थ करून दाखवीन. युवकांचे प्रेरणास्थान डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो. माझ्या नियुक्तीच्या वेळी युवा सेनेच्या सरचिटणीस पदी अमेय घोले आणि राहुल कनाल यांचीही नियुक्ती झाली आहे. लवकरच मी माझ्या युवा सेनेच्या सर्व सहकाऱ्यांसह राज्यभर युवा सेना बांधणीसाठी दौरा करणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात आम्ही जाणार आहोत. तेथे युवा सेना बांधणी करणे आणि पक्षाला बळकटी देणे हे आमचे काम असेल. युवा सेनेच्या माध्यमातून युवकांचे प्रश्न व त्यांच्या समस्या सोडविण्याचा पूर्ण प्रयत्न मी प्रमाणिकपणे करीन असे पूर्वेश सरनाईक यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.
युवा सेना म्हणजे युवकांचा आवाज. युवा सेनेच्या माध्यमातून युवकांचे संघटन करीत असताना युवकांचे प्रश्न व समस्या समजून घेतल्या जातील. त्या राज्य सरकार पर्यंत, माननीय मुख्यमंत्र्यांकडे नेऊन या समस्या, प्रश्न सोडविण्यासाठी पूर्ण वेळ काम करणार आहे. युवकांचे शिक्षण, रोजगार, क्रीडा , सामाजिक असे सगळेच मुद्दे उचलू. सामान्य घरातील युवकांना ही राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना योग्य ती जबाबदारी देण्याचा ही प्रयत्न केला जाईल. येणाऱ्या काळात युवा सेना ही राज्यातील सर्वात मोठी युवा संघटना बनविण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल आणि राज्यात युवा सेना एक नंबर वर असेल असा विश्वास पूर्वेश सरनाईक यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
दरम्यान, युवा सेना कार्याध्यक्ष पदी नियुक्ती झाल्या नंतर युवा कार्यकर्त्यांनी मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर, वसई विरार अशा विविध भागात फटाके फोडून जल्लोष केला आणि या नियुक्तीचे स्वागत केले.
ही बातमी वाचा: