काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधींना सावरकरांच्या कार्याची माहिती द्यावी : संजय राऊत
स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबतची आमची भूमिका कधी बदललेली नाही आणि बदलणारही नाही, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं.
मुंबई : राहुल गांधी यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची राज्यातील काँग्रेस नेत्यांनी माहिती द्यावी. सावरकरांबाबत राहुल गांधींना चुकीची माहिती देण्यात आली आहे. राहुल गांधीना काँग्रेस नेत्यांनी 'माझी जन्मठेप' हे पुस्तक वाचायला दिलं पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्राचा अभिमान आहेत. राहुल गांधी यांच्या सावरकरांबाबतच्या वक्तव्यानंतर शिवसेना-काँग्रेसमध्ये मतभेद झाल्याचं दिसून येत आहे. त्यावर बोलताना महाशिवआघाडीचं सरकार पुढील पाच वर्ष चालणार आहे, असंही संजय राऊत यांनी सांगितलं. तर नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर आमची भूमिका आम्ही स्पष्ट केल्याचंही संजय राऊत यांनी सांगितलं.
स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबतची आमची भूमिका कधी बदललेली नाही आणि बदलणारही नाही, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. शिवसेनेने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी पुन्हा एकदा केली आहे. देशात सरदार वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरु, महात्मा गांधी यांच्याबद्दल भिन्न विचार आहेत. मात्र त्यांचा देशासाठीचं योगदान विसरुन चालणार नाही. त्यामुळे राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे देशासाठीचं त्यांचं योगदान नाकारलं जाऊ शकत नाही, असं संजय राऊत म्हणाले.
काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्यानंमिका मवाळ होईल, असं वाटतं होतं. मात्र स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत घेतलेल्या भूमिकावरुन सावरकर शिवसेनेसाठी हिरो असतील आणि हिरो राहतील, असं शिवसेनेने स्पष्ट केलं आहे. सावरकर महाराष्ट्रसाठीच नाही तर देशासाठी प्रेरणादायी आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
देशातील बलात्काराच्या वाढत्या घटनांवर बोलताना राहुल गांधी यांनी देशाचा उल्लेख 'रेप इन इंडिया' केला होता. या वक्तव्यावरून राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी भाजपने केली होती. त्यावर काँग्रेसच्या 'भारत बचाओ' रॅलीत राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला. "मी माफी मागणार नाही. मी राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे", असं राहुल गांधींनी म्हटलं होतं. मी मरेन मात्र माफी मागणार नाही. नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागायला हवी. मोदींचे असिस्टंट अमित शाह यांनी देशाची माफी मागायला हवी, असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.