रायगडमधील सुरेश कालगुडे मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल
महाड एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी पोलिसांनी कंटेनर चालक शिवपती पटेल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कट करून खून केल्याचा आरोप शिवपती पटेलवर ठेवण्यात आला आहे.
रायगड : रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेश कालगुडे यांच्या मृत्यू प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. महाड एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी पोलिसांनी कंटेनर चालक शिवपती पटेल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कट करून खून केल्याचा आरोप शिवपती पटेलवर ठेवण्यात आला आहे.
रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेश कालगुडे यांचा अपघाती मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. महाड औद्योगिक वसाहतीतील झुआरी फर्टिलायझर्स कारखान्याजवळ ही घटना घडली होती.
मात्र हा घातपात असल्याचा आरोप स्थानिक शिवसैनिकांनी केला होता. ट्रेलर चालकासोबत झालेल्या किरकोळ वादातून कालगुडे यांची हत्या झाल्याचा संशय शिवसैनिकांनी व्यक्त केला होता. त्यानंतर पोलिसांनी सखोल चौकशी करत खुनाचा गुन्हा दाखल केला.
सुरेश कालगुडे यांचे महाड एमआयडीसी भागात असलेल्या झुआरी फर्टिलायझर्स या कारखान्यात जेसीबीचं कंत्राट होतं. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास कंपनीतील जेसीबी चालक आणि ट्रेलर चालक या दोघांमध्ये गाडीवरुन वाद झाला. या घटनेची माहिती जेसीबी चालकाने कालगुडे यांना दिल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर कालगुडे आणि ट्रेलरचालक यांच्यामध्ये वाद झाला.
या वादानंतर कालगुडेंचा ट्रेलरला धडकून अपघाती मृत्यू झाला. मात्र या वादाच्या पार्श्वभूमीवर कालगुडे यांच्या मृत्यूबद्दल शिवसैनिकांकडून संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर महाड परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाड औद्योगिक पोलीस ठाणे कारखाना आणि शासकीय रुग्णालय या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.