एक्स्प्लोर
पंकजा मुंडेंचा मेटेंना धक्का, ‘शिवसंग्राम’चे राजेंद्र मस्के भाजपच्या वाटेवर
राष्ट्रवादीच्या सुरेश धसांना भाजपात घेऊन आमदार बनवले, आता राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांचीही भाजपाशी असलेली सलगी कायम समोर येत असते. आता राजेंद्र मस्केंच्या रुपाने पंकजा मुंडेंचे बेरजेचे राजकारण पाहायला मिळते आहे.
![पंकजा मुंडेंचा मेटेंना धक्का, ‘शिवसंग्राम’चे राजेंद्र मस्के भाजपच्या वाटेवर Shivsangram Leader Rajendra Maske likely to enter in BJP पंकजा मुंडेंचा मेटेंना धक्का, ‘शिवसंग्राम’चे राजेंद्र मस्के भाजपच्या वाटेवर](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/09/05182253/Pankaja_Mete.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बीड : भाजप सरकारचा घटक पक्ष असलेला विनायक मेटेंचा शिवसंग्राम पक्ष आणि पंकजा मुंडे यांच्यात कायमच दुरावा पाहायला मिळतो. एकाच व्यासपीठावर असतानाही एकमेकांशी अपवादानेच बोलणाऱ्या पंकजा मुंडे आणि विनायक मेटे यांच्यातील वाद या ना त्या कारणाने कायम चर्चेत असतोच. आता तर शिवसंग्रामचे युवा प्रदेशाध्यक्, राजेंद्र मस्केच भाजपच्या वाटेवर आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी विनायक मेटेंना जोरदार धक्का देण्याची तयारी सुरु केल्याचे दिसून येते आहे.
बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद हातात असताना, राजेंद्र मस्के यांनी पंकजा मुंडेंच्या हस्ते रस्त्याच्या कामाचा शुभारंभ ठेवला. एरवी ‘आपले सर्वकाही विनायक मेटे’ असे सांगणाऱ्या राजेंद्र मस्केंनी यावेळी पंकजा मुंडेंची भव्य रॅली काढली. व्यासपीठावरच्या बॅनरसह सगळीकडे पंकजा मुंडेंचे होर्डिंग लावले.
बीडच्या राजकारणात मेटे आणि पंकजा मुंडे यांचे फार काही बनत नाही. एकीकडे मुख्यामंत्र्याशी जवळीक साधणाऱ्या मेटेंना पंकजा मुंडे मात्र कायम दोन हात दूरच ठेवतात. म्हणूनच मेटेंचा शिलेदार असलेल्या मस्केंच्या कामावर पंकजा मुंडेंनी जाहीर स्तुती सुमने उधळली. एवढेच नाही तर राजेंद्र मस्के यांचं घर माझ्यासाठी लकी असून जिल्हा परिषदेमध्ये सत्तांतर करण्यासाठी त्यांच्याच घरी बैठक झाली होती आणि यापुढेही त्यांच्याच घरी बैठका घेण्याची परवानगी त्यांनी मला द्यावी, असे जाहीर करुन भविष्यात राजेंद्र मस्के आपल्यासोबत असतील असा गर्भित इशाराही पंकजा मुंडेंनी दिला.
बीड जिल्हा परिषदेत संख्याबळ कमी असतानाही शिवसंग्राम आणि शिवसेनेला सोबत घेऊन पंकजा मुंडेंनी सत्ता मिळवली. यात शिवसंग्रामच्या राजेंद्र मस्केंच्या पत्नीला जिल्हा परिषदेत उपाध्यक्षही बनवण्यात आले. जिल्हा परिषदेत सोबत असतानाही पंकजा मुंडे आणि मेटे यांच्यात राजकीय कुरघोडी कायम चालूच होती. याउलट राजेंद्र मस्केंची भाजपाशी जवळीकता प्रकर्षाने जाणवत होती.
राष्ट्रवादीच्या सुरेश धसांना भाजपात घेऊन आमदार बनवले, आता राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांचीही भाजपाशी असलेली सलगी कायम समोर येत असते. आता राजेंद्र मस्केंच्या रुपाने पंकजा मुंडेंचे बेरजेचे राजकारण पाहायला मिळते आहे. म्हणूनच पंकजा मुंडेंनी राजेंद्र मस्केंच्या रुपाने एकीकडे मेटेंना धक्का दिला आहे. शिवाय आपली ताकदही दाखवून दिली आहे.
येणारा काळ निवडणुकांचा आहे. म्हणूनच बीडच्या राजकीय घाडामोडींना वेग आला आहे. एकीकडे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी हा संघर्ष अधिक तीव्र होताना पाहायला मिळतोय, तर दुसरीकडे फोडाफोडीच्या राजकारणालाही आतापासूनच सुरुवात झाल्याची दिसतेय.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)