(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ईडीच्या नोटीसीनंतर एकनाथ खडसे कोरोना पॉझिटिव्ह, अहवालात गौडबंगाल असल्याचा शिवराम पाटील यांचा आरोप
ईडीच्या नोटीसीनंतर एकनाथ खडसे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र, या अहवालात गौडबंगाल असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील यांनी केला आहे.
जळगाव : ईडीच्या नोटीसनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र, त्यातील तारखांचा विचार केला तर या अहवालात काहीतरी गौडबंगाल असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील यांनी पत्रकार परिषद घेत केला आहे.
शिवराम पाटील यांनी पत्रकार परिषद घेताना काही मुद्दे मांडले आहेत. त्यात 30 डिसेंबरला होणाऱ्या ईडीच्या चौकशीसाठी खडसे हे 27 तारखेला जळगावहुन मुंबईकडे रवाना झाले होते. 28 तारखेला ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले आहेत, असा खुलासा खडसे यांच्या कार्यकर्त्यांनी माध्यमांकडे केला असल्याचा पाटील यांनी दावा केला आहे.
एकाच वेळी खडसे यांनी दोन ठिकाणी स्वॅब कसे दिले? : शिवराम पाटील 29 ला खडसे यांचा जळगाव सिव्हिल मधील ओपीडी रेकॉर्डचा विचार केला तर त्या दिवशी त्यांनी स्वॅब दिल्याचे समोर येते तर त्याच दिवशी उप जिल्हा रुग्णालय मुक्ताईनगरहुन देखील खडसे यांचा स्वॅब तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात येतो आणि 30 डिसेंबरला त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह येतो. हे सर्व पाहता एकाच वेळेस खडसे यांचा दोन ठिकाणी स्वॅब कसा घेतला जाऊ शकतो. या शिवाय त्याच दिवशी ते मुंबईत असू शकतील का की हा स्वॅब अन्य कोणाचा घेतला आहे, असा सवाल शिवराम पाटील यांनी उपस्तीत केला आहे.
खडसे यांच्या संपर्कातील लोकांची कोरोना टेस्ट का नाही? शिवाय खडसे यांची कोरोना टेस्ट जर पॉझिटिव्ह आली असल्याचे 30 तारखेला समोर आले होते. तर 28 तारखेला मुख्यमंत्री यांना ते भेटले आहेत तर मुख्यमंत्री यांची भेट घेतल्यामुळे उद्धव ठाकरे यांची आणि खडसे यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची कोरोना चाचणी करायला पाहिजे होती. शिवाय त्यांनीही क्वॉरंटाईन व्हायला पाहिजे होते. मात्र, तसे झालेले नसल्याने एकनाथ खडसे आणि उद्धव ठाकरे यांना हे सर्व गौडबंगाल माहीत आहे, हा प्रशासनाचा गैर वापर आहे, असं पाटील यांनी म्हटलं आहे.
खडसे हे पॉझिटिव्ह असल्याने त्यांच्यावर घरी नव्हे तर रुग्णालयात उपचार केले जायला पाहीजे होते. मात्र, खडसे यांची टेस्ट आणि त्यांचा अहवाल हा खरा आहे का? असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला आहे. शिवराम पाटील हे माहिती अधिकार आणि सामाजिक कार्यकर्ते राहिले असून जळगाव जागृत मंचच्या माध्यमातून त्यांनी नेहमीच राजकीय नेत्यांच्या विरोधात आपला आवाज उठवला आहे. एकनाथ खडसे यांच्या कोरोनाबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे राजकीय गोटात मात्र चर्चेचा विषय बनला आहे.
Eknath Khadse ED Summon | एकनाथ खडसे 14 दिवसांनी ईडीसमोर हजर होणार!