Sudhir Mungantiwar : राज्यशस्त्र म्हणून दांडपट्ट्याला मान्यता; सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
Sudhir Mungantiwar : शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या 350 व्या वर्षानिमित्त दांडपट्ट्याला राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्यात येणार असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली आहे.
Sudhir Mungantiwar : छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) जयंती आज सर्वत्र मोठ्या हर्ष-उल्हासात साजरी केली जात आहे. शिवजयंतीच्या या उत्सवात आणखी एका आनंददायी बातमीची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केली आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या 350 व्या वर्षानिमित्त शिव जयंतीच्याच दिवशी दांडपट्ट्याला राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्यात येणार असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली आहे. आज संध्याकाळी आग्र्याच्या किल्ल्यात शिवजयंतीच्या निमित्ताने संपन्न होणाऱ्या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे मान्यता देणार असल्याचे देखील मुनगंटीवार म्हणाले.
मराठ्यांच्या जाज्वल्य इतिहासात मराठा शस्त्र म्हणून दांडपट्ट्याला महत्वाचे स्थान राहिले आहे. मराठा सैन्याचं हे वैशिष्ट्यपूर्ण शस्त्र असून त्याचं महत्त्व अधोरेखित होण्यासाठी दांडपट्टा राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्यात येणार आहे. दांडपट्ट्याला राज्यशस्त्र जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य असल्याचे देखील सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्यशस्त्राच्या मान्यता
ज्या आग्र्याच्या लाल किल्ल्यातील मोगली दरबाराने कधीकाळी छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान आणि बानेदारपणा अनुभवला होता, आज त्याच दरबारात पुन्हा एकदा शिवरायांच्या जयघोषाने सर्व परिसर दणाणून निघणार आहे. राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आज 19 फेब्रुवारीच्या रात्री आठ वाजता आग्र्यात लाल किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार इत्यादींसह सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दांडपट्टा या शस्त्राला राज्यशस्त्राच्या जीआरला मान्यता देणार असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यानी दिली. रशियन इतिहासकार यांनी शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या पुस्तकांमध्ये देखील या मराठा शस्त्राचे महत्व विशद केले आहे. यासह जगभरात तत्कालीन काळातील इतिहास अभ्यासक, लेखकांनी हे मराठा शस्त्र नाविन्यपूर्ण प्रकार असल्याचे वर्णन केले आहे. या मराठा शस्त्राचे महत्व लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला असून देशभरातील तमाम शिवभक्तांसाठी, देशवासियांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी असल्याचं मत वन आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बोलतांना व्यक्त केले.
आज दुबईसह जगातील ६० देशांत शिवजयंतीचा उत्साह
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती केवळ मराठी मुलखातच नव्हे किंवा भारतातच नव्हे तर सात समुद्रा पलीकडे साजरी व्हायला लागली आहे. आज शिवाजी महाराजांची 394 जयंती 60 पेक्षा अधिक देशात साजरी होत असून "छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विचार मंच दुबई" आणि "सत्यशोधक दुबई" यांनी "ज्ञानवर्धक शिवजयंती" दुबई येथे ग्रँड एक्सलियार हॉटेल , बर येथे साजरी केली. या कार्यक्रमाला प्रमुख व्याख्याते म्हणून मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर होते. गेल्या दहा वर्षापासून दुबई येथे शिवजयंती साजरी करण्यात येते. मात्र एखाद्या इस्लामिक देशात जाऊन शिवाजी महाराजांवर व्याख्यान देण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे मत पुरुषोत्तम खेडेकर यांना व्यक्त केले आहे.