मंत्री गुलाबराव पाटलांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरेंचे बॅनर फाडले; 'शिवसंवाद' यात्रा आज जळगाव जिल्ह्यात
Aaditya Thackeray Jalgaon Tour : पाचोरा, धरणगाव, पारोळा, मालेगावमध्ये आदित्य ठाकरे हे शिवसैनिकाशी संवाद साधणार आहेत. दरम्यान आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याआधी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Aaditya Thackeray Jalgaon Tour : युवासेनेचे प्रमुख आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आजपासून जळगाव जिल्ह्याच्या (Jalgaon Tour) दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यातील शिवसेनेचे पाच आमदार शिंदे गटात (CM Eknath Shinde) गेल्यानंतर शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे बंडखोर आमदार किशोर पाटील, गुलाबराव पाटील आणि चिमण आबा पाटील यांच्या मतदार संघात जाणार आहेत. पाचोरा, धरणगाव, पारोळा, मालेगावमध्ये आदित्य ठाकरे हे शिवसैनिकाशी संवाद साधणार आहेत. दरम्यान आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याआधी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आदित्य ठाकरे यांचा आज धरणगावात ज्या मार्गाने प्रवेश होणार आहे. त्याच मार्गावरील बॅनर फाडल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली आहे. यामुळे काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता. आदित्य ठाकरे यांचा शिव संवाद यात्रा दौरा आज दुपारी 1 वाजता धरणगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकजवळ आयोजित केला आहे. यानिमित्ताने धरणगाव शहरात शिवसेना आणि युवा सेनेकडून आदित्य ठाकरे यांचे स्वागत बॅनर जागोजागी लावले आहेत.
शहरातील गणेश नगर, हेडगेवार नगर आणि उड्डाण पुलाजवळ शिव संवाद यात्रेचे स्वागत करणारे बॅनर लावले आहेत. शुक्रवारी मध्यरात्री काही अज्ञातांकडून हे बॅनर फाडल्याचा प्रकार पाहायला मिळाला. जवळपास सहा ते सात ठिकाणी हे बॅनर फाडण्यात आले आहेत. या घटनेमुळे शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल खताळ आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष निलेश चौधरी, माजी उपनगराध्यक्ष देविदास बापू महाजन, नगरसेवक वासुदेव चौधरी, भागवत चौधरी, किरण अग्निहोत्री, रविंद्र जाधव, भरत माळी या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सूचना दिल्या.
बंडखोरांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला महत्त्व का?
मंत्री गुलाबराव पाटील
कट्टर शिवसैनिक तसेच शिवसेनेचे मुलुख मैदान तोफ म्हणून गुलाबराव पाटील यांची ओळख होती. जळगाव ग्रामीण मतदार संघात 1999 ते 2019 पर्यंत निवडणुकीत 2009 ची निवडणूक वगळता सलग चार आमदार म्हणून निवडून आले. पान टपरी पासून मंत्रीपदापर्यंतचा त्यांचा प्रवास आहे. घट्ट पकड झाल्यावर गुलाबराव पाटील शिंदे गटात सहभागी झाले आहे. गुलाबराव पाटील हे कॅबिनेट मंत्री आहेत.
आमदार किशोर पाटील
पाचोरा तालुक्याचे दिवंगत माजी आमदार आर ओ पाटील हे कट्टर शिवसैनिक होते. आर ओ. पाटील हे किशोर पाटील यांचे काका होते. आर.ओ. पाटील यांच्यामुळे आमदार किशोर पाटील हे राजकारणात आले. पाचोरा मतदार संघात सलग दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले. आमदार किशोर पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केला असून ते मंत्रीपदाचे दावेदार आहेत.
आमदार चिमणराव पाटील
पारोळा येथील आमदार चिमणराव पाटील हे कट्टर शिवसैनिक म्हणून शिवसेनेचे काम करत होते. दोन वेळा ते पारोळा एरंडोल या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. दूध संघावर ते गेल्या काही वर्षापासून संचालक आहेत. त्यांनीही नुकताच शिंदे गटात प्रवेश केला असून ते सुद्धा मंत्री पदाचे दावेदार आहेत.