(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Enough is Enough! आता संयम आणि सौजन्याची ऐशी तैशी...; संजय राऊतांचं ट्वीट
Sanjay Raut Tweet : Enough is Enough! आता संयम आणि सौजन्याची ऐशी तैशी...; शिवसेना खासदार संजय राऊतांचं ट्वीट व्हायरल
Sanjay Raut Tweet : राज्यात हनुमान चालिया पठणावरुन चांगलाच वादंग सुरु आहे. सध्या राणा विरुद्ध सेना यावरुन हाय व्होल्टेज ड्रामा सुरु आहे. अशातच महाराष्ट्रात शिवसेनेला आव्हान देण्यासाठी सात जन्म घ्यावे लागतील, असं माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यानंतर राऊतांनी एक ट्वीट केलं आहे. आता संयम आणि सौजन्याची ऐशी तैशी, असं संजय राऊतांनी ट्वीट केलं आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट केलं आहे की, "Enough is Enough! आता संयम आणि सौजन्याची ऐशी तैशी... जय महाराष्ट्र!!"
आय रिपीट, राष्ट्रपती राजवटीच्या धमक्या द्यायच्या नाहीत : संजय राऊत
"आम्हाला धमक्या देऊ नका. राष्ट्रपती राजवट लागेल, केंद्रीय तपास यंत्रणा येतील, या धमक्या देऊ नका. हिंमत असेल तर सीबीआय लावा, ईडी लावा. आम्हाला त्रास द्या. आम्ही तुम्हाला घाबरत नाही. आता शिवसैनिकांवर कोणाचाही कंट्रोल नाही. अजून काहीच सुरु झालेलं नाही. दोन दिवसांपासून ज्या घटना पाहताय तुम्ही मुंबईत. या फक्त शिवसैनिकांच्या भावनांचा उद्रेक नाही, तर जनतेच्या भावनांचा हा स्फोट आहे. मी सध्या नागपुरात आहे. मी इथून सगळं वातावरण पाहतोय. तुम्ही आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न कराल, तर तुम्हालाही घरं आहेत. हे लक्षात घ्या.", असं संजय राऊत म्हणाले. तसेच, "केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन तुम्ही आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न कराल, तर आम्हाला आमच्या रक्षणासाठी पोलिसांचीही गरज नाही. शिवसैनिक सक्षम आहेत. आणि शिवसैनिक सदैव मरायला आणि मारायला तयार असतो. सरकार असल्यामुळं नक्की आमचे हात बांधले गेले आहेत." असंही ते म्हणाले.
"आय रिपीट, राष्ट्रपती राजवटीच्या धमक्या द्यायच्या नाहीत. लावा राजवट. माझं आत्ताच मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं. राष्ट्रपती राजवट, सीबीआय, ईडी यापलिकडे आम्ही गेलोय. सत्तेची पर्वा आम्हाला नाही. बाळासाहेबांचं एक अजरामर वाक्य आहे. आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी आली आहे. सत्ता फक्त खुर्चीची नसते. शिवसेना हीच एक पॉवर. तुम्हाला जर त्याचा चटका घ्यायचा असेल, तर तुम्ही घेऊ शकता. यापूर्वी लोकांनी घेतलाय. जे होतंय ते होऊन जाऊ देत. एकदाच होईल." , असं संजय राऊत म्हणाले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :