समृद्धी महामार्गाच्या कामाला विरोध; शिवसेना आमदाराकडूनच मुख्यमंत्र्यांच्या पायलट प्रोजेक्टविरुद्ध एल्गार
समृद्धी महामार्गाच्या कामाच्या विरोधात शिवसेनेचे आमदार डॉ. संजय रायमूलकर हे आंदोलन करणार आहेत.
Sanjay Raimulkar Agitation : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पायलट प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामाविरोधात आता शिवसेनेचे एक आमदारच मैदानात उतरले आहेत. समृद्धी महामार्गाच्या कामाच्या विरोधात शिवसेनेचे आमदार संजय रायमूलकर हे आंदोलन करणार आहेत. समृद्धी महामार्गाच्या कामामुळं शेतकऱ्यांचे पिढ्यानपिढ्या असलेले पाण्याच्या वहिवाटीचे मार्ग, शेतात जाण्याचे रस्ते पूर्णतः बदलले आहेत. महामार्गाच्या खाली ठेवलेलं अंडरपास हे अतिशय छोटे आहेत. त्यामुळे त्यातून बैलगाडी सुद्धा जात नसल्याने शेतकऱ्यांना पावसाळ्यात शेतात जाण्यासाठी अर्धा किलोमीटर फेऱ्याने जावं लागत असल्याची तक्रार आमदार संजय रायमूलकर यांनी केली आहे.
आज शिवसेनेचे आमदार संजय रायमूलकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्याचं समृद्धी महामार्गावरील कामाच्या विरोधात मेहकर येथील MSRDC च्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हा पायलट प्रोजेक्ट म्हणून ओळखला जातो. दरम्यान, समृद्धी महामार्गावरील कामाच्या विरोधातच शिवसेनेच्या आमदाराच हे आंदोलन असल्यानं आता शिवसेना यात काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
काय आहेत शेतकऱ्यांच्या समस्या
समृद्धी महामार्ग हा नागपूर-मुंबई असा विशालकाय महामार्ग आहे. यावरुन धावणाऱ्या वाहनांचा वेगही तसा मोठा असणार आहे. त्यामुळं या महामार्गावरुन प्राणी किंवा वाहनांना अडथळा होणार नाही म्हणून मुख्य मार्गाच्या दोन्ही बाजूने 12 फूट उंच भिंती घेण्यात आल्या आहेत, ज्याला एक्सेस कंट्रोल असे म्हणतात. यामुळं मात्र शेतकऱ्यांचे असलेले जुने महसुली रस्ते तसेच पावसाळ्यात पाणी वाहून जाण्यासाठीचा मार्ग संपूर्णपणे उध्वस्त झाले आहेत. शिवाय शेतकऱ्यांना समृद्धी महामार्ग पार करुन आपल्या शेतात जण्यासाठीचे मार्गही बदलले आहेत. अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी चक्क एक किलोमीटरपर्यंत दूरच्या मार्गानं जावं लागत आहे. तर अनेक ठिकाणी मार्गाच्या खालून ठेवण्यात आलेले अंडर पासेस इतके छोटे तयार करण्यात आले आहेत की त्यातून शेतकऱ्यांची बैलगाडी किंवा ट्रॅक्टरसुद्धा जाऊ शकत नाही. अशा सर्व समस्या घेऊन मेहकरचे आमदार डॉ. संजय रायमूलकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन आज होणार आहे.
मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर तर नाही ना...?
हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पायलट प्रोजेक्ट आहे. या संबंधित महामार्गाच्या कामाशी संबंधित खात्याचे मंत्रीही शिवसेनेचे आहेत. असे असतानाही शिवसेनेच्या आमदाराला या कामाविरुद्ध आंदोलन करावं लागतं आहे. यामुळं शंका कुशंका ना उधाण आले आहे. एक शिवसेनेचा आमदाराच या सर्व कामांना आव्हान तर देत नाही ना ? शिवसेनेला हा घरचा आहेर तर नाही ना ? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर यामुळे घडू शकतात मोठे अपघात, वाहन तज्ज्ञांकडून भिती व्यक्त
- Sammruddhi Mahamarg : उद्घाटनापूर्वीच समृद्धी महामार्गाची कमान कोसळून मोठी दुर्घटना, 1 ठार तर 2 जखमी