Malegaon Election Results 2026: राज्यभरात मुसंडी, पण मालेगावात एमआयएमला 'धोबी पछाड'; इस्लाम पार्टीने ओवैसींची कशी केली कोंडी?
Malegaon Election Results 2026: एमआयएमचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या मालेगावमध्ये माजी आमदार आसिफ शेख यांच्या इस्लाम पार्टीने एमआयएमला जोरदार धक्का दिला आहे.

Malegaon Election Results 2026: राज्यातील 29 महापालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी एमआयएमने (AIMIM) जोरदार मुसंडी मारली आहे. मात्र, नाशिकच्या मालेगावच्या निवडणुकीत (Malegaon Election Results 2026) माजी आमदार आसिफ शेख (Asif Shaikh) यांच्या नवख्या असलेल्या इस्लाम पार्टीने (Islam Party) एमआयएमची ही घोडदौड अवघ्या 21जागांवर रोखली. इस्लाम पार्टीने 35 जागा जिंकत मालेगावात सर्वात मोठा पक्ष म्हणून मुसंडी मारली.
राज्यात महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने सध्या हैद्राबादच्या एमआयएम पक्षाची जोरदार चर्चा रंगली आहे. महापालिका निवडणुकीत एमआयएमने 100 पेक्षा जास्त जागा मिळवत अनेक महापालिकेत एमआयएम क्रमांक दोनचा पक्ष ठरला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह धर्मनिरपेक्ष पक्षांसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. सेक्युलर पक्षाची अल्पसंख्यांक व्होट बँक एमआयएमकडे वळत आहे. मात्र, राज्यात एमआयएमचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या नाशिकच्या मालेगावमध्ये नव्याने स्थापन झालेल्या माजी आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखालील इस्लाम पार्टीने एमआयएमला जोरदार धक्का दिला आहे. मालेगावात दोन टर्म एमआयएमचा आमदार आहे. पक्षाची मोठी ताकद आहे. मात्र, माजी आमदार आसिफ शेख यांनी समाजवादी पक्षाला सोबत घेत 'मालेगाव सेक्युलर फ्रंट' ची स्थापना करत एमआयएमचा उधळलेला वारू केवळ 21 जागेवर रोखलाय.
Malegaon Election Results 2026: इस्लाम पार्टीला मालेगावात 35 जागा
विशेष म्हणजे, मुस्लिमांचा पक्ष म्हणून आरोप झालेल्या इस्लाम पार्टीने हिंदू व दलित उमेदवारी देत ते निवडूनही आणले. आसिफ शेख यांनी प्रचाराचे योग्य नियोजन करीत एमआयएमची नेमकी विचारधारा काय? हे मालेगावकरांना पटवून दिले. एमआयएम पक्षाचे प्रमुख बॅरिस्टर असदुद्दीन ओवैशी यांनी मालेगावात प्रचारार्थ सभा घेतली. आसिफ शेख यांना टार्गेट केले. मात्र, आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखालील सेक्युलर फ्रंट मधील इस्लाम पार्टीने 35 जागा तर समाजवादी पार्टीने 5 अशा 40 जागा मिळवत एमआयएमला धोबी पछाड दिली.
Asif Shaikh: ...तर देशातून एमआयएम हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही: आसिफ शेख
एमआयएमला आम्ही येथे पर्याय दिला. एमआयएम पक्षाची विचारधारा कशी घातक हे समजावून सांगितले. त्यामुळे जनता आमच्या सोबत आली. आमच्या इस्लाम पार्टीवर विश्वास टाकला. भविष्यात एमआयएमला पर्याय मिळाला तर राज्यातून नव्हे तर देशातून एमआयएम हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही, असे सांगायलाही आसिफ शेख विसरले नाही. तर दुसरीकडे आमचे उमेदवार आर्थिकदृष्ट्या कमजोर होते. त्यामुळे आम्हाला पराभव पत्करावा लागल्याचा खुलासा एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी केलाय.
Malegaon Election Results 2026: इस्लाम पार्टीचा 'एमआयएम रोको पॅटर्न'
एकूणच, राज्यभरात उधळलेला एमआयएमचा वारू रोखण्यात मालेगावात इस्लाम पार्टीला यश आले. मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांनी इस्लाम पार्टीच्या माध्यमातून एमआयएम रोको पॅटर्न राबविला. हा पॅटर्न राज्यभर राबविला जाईल आणि एमआयएमला रोखण्यासाठी इतर सेक्युलर पक्षाला मालेगावसारखा प्रयोग करावा लागेल तर त्यांना अल्पसंख्याक व्होट बँक रोखता येणार असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
आणखी वाचा




















